मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन अॅक्शन; बांधावरच नुकसानग्रस्तांना केले ‘एवढ्या’ रकमेचे धनादेश वाटप

सोलापूर :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आज शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात पोहोचले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहून मुख्यमंत्री ठाकरेंनी पूरग्रस्तांना तात्काळ प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे.

आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ‘पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करा’ असे आदेश आधीच दिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर असून त्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणारच आहे. परंतु या संकटाशी सामना करताना ग्रामस्थांनी धीर सोडू नये, जीवाचे बरेवाईट करून घेऊ नये. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here