एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे मोठे भाष्य; वाचा, काय म्हटलंय पवारांनी

उस्मानाबाद :

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित झाला आहे, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले आहे. अद्याप त्यांच्या प्रवेशासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यापूर्वी २ वेळा खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार अशा वावड्या उठल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्या पेजेसवरूनही एकनाथ खडसेंचे स्वागत केल्याच्या पोस्ट दिसत आहेत. अशातच खडसेंनी २ दिवसांपूर्वी भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचेही वृत्त आले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. पवार म्हणाले की, जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची खडसे यांची भूमिका असू शकते. 

पुढे बोलताना पवार म्हटले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं त्यांनी सांगितलं आहे.   

खडसे यांच्या भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा प्रकरणावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजपातच राहतील याचा मला विश्वास आहे. पक्षाकडून कोणत्याही सदस्याने राजीनामा दिला नाही, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मला कोणत्याही नेत्याचा राजीनामा मिळाला नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here