शिवसेनेने सांगितली ‘ती’ परिस्थिती; ‘त्या’वरून राहुल गांधींना ठरवून ट्रोल केले जाईल, पण…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्र सरकारची जबाबदारी या अनुषंगाने येणाऱ्या विषयावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

सरकार चालविणे म्हणजे येडय़ागबाळय़ाचे कामच नव्हे. देशाची पत ज्या वेगाने घसरत आहे ते पाहिल्यावर चिंता वाटावी असेच वातावरण आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी आता म्हणाले आहेत, ”देशातला गरीब भुकेकंगाल आहे. कारण सरकार आपल्या खास मित्रांचेच खिसे भरण्यात मशगूल आहे.” आता यावर गांधींना ठरवून ‘ट्रोल’ केले जाईल, पण त्यामुळे देशातील लोकांना अन्न, रोजगार मिळणार आहे का? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या मोठय़ा राज्यांत भुकेच्या संदर्भात फारसे काम झालेले नाही. त्यामुळे हिंदुस्थानची एकूण कामगिरी खराब झाली आहे. राष्ट्रीय सरासरी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमुळे खाली आली आहे असे पूर्णिमा मेनन यांनी समोर आणले. पूर्णिमा या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या वरिष्ठ संशोधक आहेत. बिहार, उत्तर प्रदेशसारखी राज्ये उपासमारीत अव्वल आहेत व या दोन राज्यांत भाजपचीच सरकारे आहेत. बिहारवर मोदींचे सगळय़ात जास्त प्रेम असल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उत्तर प्रदेश, बिहार सरकारने भूक व्यवस्थापनात माती खाल्ली. कारण त्यांनी राज्य चालविण्यापेक्षा इतर भौतिक गोष्टींकडे लक्ष दिले. बिहारात भुकेपेक्षा सुशांत राजपूत प्रकरण जोरावर आणले. उत्तर प्रदेशात भूक, रोजगार सोडून इतर विषयांवर चर्चा जास्त असते. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही. कारण उद्योग, व्यापार क्षेत्रात आजही निराशा, भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला हा धक्का आहे. म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री दानवे यांनी दिले आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here