‘भारताची ‘ती’ स्थिती का आहे’ याचे उत्तर दानवेंनी दिले; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्र सरकारची जबाबदारी या अनुषंगाने येणाऱ्या विषयावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

हिंदुस्थानात 14-15 टक्के कुपोषित आहेत याचा अर्थ आणखी 25 ते 30 टक्के लोक अर्धपोटी आहेत, जगण्याचा संघर्ष करीत आहेत हे सत्य स्वीकारायला हवे. प्रदीर्घ कुपोषणामुळे मुलांची उंची खुंटते. त्यामुळे त्यांची उंची वयाच्या तुलनेत कमी असते. अशा मुलांचे प्रमाण हिंदुस्थानात 37.4 टक्के आहे. कुपोषणाचे बळी वाढत आहेत. बेरोजगारी, भूक यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. हिंदुस्थानात ही स्थिती आली कारण सुमार दर्जाची अंमलबजावणी प्रक्रिया, प्रभावी देखरेखीचा अभाव, कुपोषणाची समस्या हाताळण्यातील उदासीन दृष्टिकोन आणि मोठय़ा राज्यांची असमाधानकारक कामगिरी ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे जागतिक तज्ञांनी म्हटले आहे. हा सरळ केंद्राच्या अकार्यक्षमतेवर ठपका आहे. राज्य चालविणे म्हणजे विद्वेष पसरविणे नव्हे. कुणी भूक, बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित करीत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तानसारख्या मुद्दय़ांचे मृदंग थापडवायचे. नोटाबंदी, जीएसटीने देशाची आर्थिक ताकद कमजोर केली.

लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आहे. देशातील गंभीर समस्यांबाबत मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद ठेवायला हवा. पाकिस्तान आणि चीनच्या दादागिरीबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहावे अशी अपेक्षा असते, पण गरिबी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, भूकबळीवर सरकार विरोधकांशी चर्चा करू इच्छित नाही. कारण हे सर्व प्रश्न निर्माण झाले ते फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यामुळेच असे सध्याच्या केंद्रीय सरकारला वाटते. जर हे प्रश्न आधीच्या पंतप्रधानांमुळे निर्माण झाले असतील तर मग त्या सर्व पंतप्रधानांनी देशात जी संपत्ती कष्टाने उभी केली ती विकून विद्यमान सरकार गुजराण का करीत आहे? जागतिक श्रीमंतांच्या यादीत हिंदुस्थानातील उद्योगपतींची नावे झळकत आहेत. देशातील श्रीमंतांची यादी डोळेझाक करण्यासारखी नाही. तरीही देशातील 15 टक्के लोक कुपोषित व 35 टक्के लोक पोटभर खाऊ शकत नाहीत याचे उत्तर दानवे यांनी दिले.

संपादन : विनोद्कुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here