‘ते’ येड्यागबाळ्यांचे काम नाही म्हणत शिवसेनेने खडा केला ‘तो’ सवाल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्र सरकारची जबाबदारी या अनुषंगाने येणाऱ्या विषयावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही. कारण उद्योग, व्यापार क्षेत्रात आजही निराशा, भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला हा धक्का आहे. म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री दानवे यांनी दिले आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?

सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे गावरान विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे हे विधान राष्ट्रीय स्तरावर घेतले पाहिजे. कारण भूक किंवा कुपोषणाच्या बाबतीत हिंदुस्थानची स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवीत आहोत. दुसरीकडे देशातील 14 ते 15 टक्के लोकसंख्येला पोटभर अन्न नाही. भुकेच्या बाबतीत गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा समावेश व्हावा ही मोदी सरकारची मानहानी व देशाची शोकांतिका आहे. धक्कादायक बाब अशी की, कुपोषणाच्या बाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांवरही आपण मात केली. म्हणजे या देशांची स्थिती हिंदुस्थानपेक्षा चांगली आहे. 107 देशांच्या यादीत हिंदुस्थान 94व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 88, बांगलादेश 71, म्यानमार 78व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, चीन, श्रीलंकेचे आपल्यापेक्षा बरे चालले आहे. हे सर्व का घडते याचे उत्तर मोदी सरकारातील मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका झटक्यात देऊन टाकले. सरकार चालविणे येडय़ागबाळय़ाचे काम नाही हेच त्रिवार सत्य आहे. देशात भूक, गरिबी, कुपोषणाची स्थिती गंभीर झाली असेल तर जनतारणहार मोदी सरकार काय करते? 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here