नगरमध्ये आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीने केला बाळासाहेब थोरातांवर ‘हा’ आरोप

अहमदनगर :

राज्यात जरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असली तरी स्थानिक राजकारण वेगळ्याच समीकरणावर चालत असते. नगर जिल्हा हा वेळोवेळी स्थानिक राजकारण चव्हाट्यावर आणत राज्यस्तरीय पक्षनेत्यांना तोंडावर पाडत असतो. पारनेर शिवसेना नगरसेवक प्रकरण अजूनही ताजे असताना एक नवे प्रकरण समोर आले आहे.

कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबत नगर शहराचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी दगा-फटक्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावरून किरण काळे यांनी राष्ट्रवादीचा गुंड आमदार संग्राम अरुण जगताप याच्या दहशतीपुढे कॉंग्रेस कदापि झुकणार नाही, असे म्हणत हल्लाबोल केला. यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी म्हटले की,  काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, आता ते जबाबदार पदावर आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा पराभव केला होता. काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. 

आता राज्यात सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते यातून काय मार्ग काढतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकूणच काय तर नगरच्या राजकारणात मोठी गडबड आहे. नगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे पटत नाही आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादीचेही जुळत नाही. एकूणच राजकारणाचा अंदाज घेऊन नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या जीवावर भाजपचा महापौर निवांतपणे सत्तेत आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here