नगर तालुक्यातील रखडलेल्या ‘या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच…

अहमदनगर :

नगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती आणि ५४ सेवा सोसायट्यांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या. त्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यासाठी गावपुढार्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान निवडणुका पार पडणार होत्या मात्र, कोरानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने निवडणुका पुढे  ढकलल्या आहेत. हळूहळू सर्व स्थिती पूर्वपदावर येत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

गाव पुढाऱ्यांनी मात्र आत्तापासूनच निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने असली तरीही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढविण्यासाठी युवा नेते, आणि राजकीय पुढारी प्रयत्नशील आहे.

सोशल ‘इमेज’ निर्मितीवर भर :-

निवडणुका कोणत्याही असो सध्याच्या डिजिटल युगात सोशल मिडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुक, व्हॉटसअप आणि इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही प्रतिमा निर्मितीसाठी इच्छुक उमेदवार आघाडी घेत आहेत. अनेकांनी स्वतःच्या नावाने फेसबुक पेजेस तयार करून त्यामार्फत राजकारणात नव्या ‘ट्रेंड’ची भर टाकली आहे. गावातील कार्यकर्ते, महत्वाच्या पदावरील व्यक्ती, व राजकारणात ज्यांच्याकडून फायदा होईल अशा व्यक्ती हेरून त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले जात आहे. या सोशल कॅम्पेनची आता गावागावांत चर्चा झडत आहेत.

पक्षांतर बंदी कायदाही लागू असणार का ? याकडेही असेल लक्ष…

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षांतर बंदी कायदा लागू होणार आहे. भाजपप्रणीत सरकारने थेट सरपंच निवडीचा कायदा केला होता. सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने ह्या नियमात बदल केला. त्यामुळे सरपंच परिषदेने ‘या’ निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. सरपंचपद अस्थिर होत असल्याने राज्य सरकारने पक्षांतर बंदी कायदा लागू करावा अशी मागणी केली  होती. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय असे जाहीर केले आहे. काही सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे, याला कोर्टात आव्हान देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय लागू असेल की नाही, याकडे गावपुढार्यांचे लक्ष लागून आहे.  

निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती
पारगावमौला, रतडगाव, देवगाव, वारूळवाडी, इसळक, निमगाव घाणा, दरेवाडी, आंबीलवाडी, बाराबाभळी, वाटेफळ, हातवळण, मठपिंपरी, रुईछत्तीशी, गुंडेगाव, पोखर्डी, निमगाव वाघा, अकोळनेर, भोरवाडी, खारे कर्जुने, इमामपूर, घोसपुरी, बुऱ्हाणनगर, वडारवाडी, जेऊर, खंडाळा, कोल्हेवाडी, गुणवडी खडकी, ससेवाडी, उदरमल, कामरगाव, चास, तांदळी, वडगाव, शिंगवे नाईक, सांडवे, निंबळक, नवनागापूर, वाकोडी, वाळुंज, घोसपुरी, माथनी, बाळेवाडी, खांडके, शिराढोण, हमीदपूर, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघ, चिचोंडी पाटील, टाकळीकाझी, डोंगरगण, मांजरसुंबा, दशमीगव्हाण, मांडवे, धनगरवाडी, या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

संपादन : महादेव गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here