तरच देश सुरक्षित राहील; बिहारचा ‘तो’ संदर्भ देत शिवसेनेनं व्यक्त केली चिंता

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून राज्यापासून तर देशपातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींवर भाष्य करत टीका केली आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

बिहार निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सगळय़ांनाच आहे. बिहारची निवडणूक एकतर्फी होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. लालू यादव तुरुंगात आहेत, पण त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत संपूर्ण बिहारात दौरे करून वातावरण तयार केले. चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या ‘जदयु’विरोधात सर्वत्र उमेदवार उभे करण्याचे ठरवले. तसे झाले तर भाजप आमदारांचा आकडा जदयुपेक्षा मोठा होईल हे तर नक्कीच. बिहारात अशा वेळी राजभवन हेच सत्ताकेंद्र बनू शकते व राजकीय विरोधकांना निपटवण्याच्या खेळात राजभवनाचे महत्त्व वाढेल. अशा वेळेस धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर काय करणार ते पाहावे लागेल. बिहारची स्थिती आज चांगली नाही. मागास राज्य म्हणून अधिक मदत मिळावी अशी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. हे कसले लक्षण? या निवडणूक प्रचारातील गंमत अशी की, नितीश कुमार हे बिहारात पंधरा वर्षे राज्य करीत आहेत, पण नितीश कुमार लालू यादवांकडे ‘हिशेब’ मागत आहेत.

बिहारात अपराध वाढले, त्याचा जाब सुशील मोदी राहुल गांधींकडे मागत आहेत. मुख्य म्हणजे मधल्या काळात नितीश कुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन सरकारही बनवले होते. या सगळय़ात निपटली गेली ती बिच्चारी जनता! हे चित्र फक्त बिहारचेच नाही, तर संपूर्ण देशाचे आहे. हिंदुस्थानच्या लोकांवर सध्या इतकी संकटे कोसळत आहेत की, त्यातून हिंदुस्थानला कधी डोके वर काढता येईल अशी आशा बाळगण्याला क्वचितच आशा उरलेली आहे. त्यात चीनचे 60 हजार सैन्य लडाखच्या सीमेवर उभे आहे. युद्ध देशात व बाहेर होईल. निपटवण्याचा खेळ थांबला तरच देश सुरक्षित राहील.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here