तर ‘त्यांनी’ देशाची माफी मागायला हवी म्हणत शिवसेनेनं केली गृहमंत्र्यांवर टीका

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून राज्यापासून तर देशपातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींवर भाष्य करत टीका केली आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

श्री. नरेंद्र मोदी हे भगवान श्रीकृष्ण आणि अमित शहा हे अर्जुन असे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर त्यांचे काही चुकत नाही, पण खऱया धर्मस्थापनेचे, देशावरील संकटे दूर करण्याचे काम त्यांनी करावे इतकीच अपेक्षा आहे. श्री. बाळासाहेब ठाकरे हे लाखो लोकांसाठी दैवी अवतार ठरले होते. चीनने सीमेवर 60 हजार सैन्य जमा केले आहे. युद्धास तयार रहा असे चिनी सैनिकांना आदेश आहेत. चीन नेपाळमध्ये घुसलंय. आता त्यांनी नेपाळच्या सैनिकांवरच हल्ले केले. त्याच चीनच्या मदतीने आपण कश्मीरात पुन्हा 370 कलम लागू करू, असे डॉ. फारुख अब्दुल्ला उघडपणे म्हणाले. एक तर डॉ. अब्दुल्ला यांनी देशाची माफी मागायला हवी. नाही तर केंद्राने अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. डॉ. अब्दुल्लांचे वक्तव्य हा फक्त बिहार किंवा पं. बंगालच्या निवडणुकांतील प्रचारांचा मुद्दा नाही.

कश्मीर खोऱयात कुणाला तरी चीनचा सरळ हस्तक्षेप करायला हवा आहे व त्यावर देशाच्या गृहमंत्र्यांकडून कोणतेही प्रत्युत्तर नाही. आता प्रश्न इतकाच आहे की, डॉ. अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांना केंद्र सरकारने आधी तुरुंगात टाकले. कारण 370 कलम हटवायला त्यांचा विरोध होता. आता ते बाहेर आले तेव्हा चीनच्या मदतीची अपेक्षा ते करीत आहेत. कश्मीरपासून लडाख अडीचशे किलोमीटरवर आहे व आता लडाखच्या सीमेवर चीनने 60 हजार इतके सैन्य आणून उभे केले. या सैन्याने कश्मीरपर्यंत यावे व 370 कलम पुन्हा आणण्यात मदत करावी, असे बोलणे हा सरळ राष्ट्रद्रोहच आहे. देशांतर्गत स्थिती हाताबाहेर गेल्याचे हे चिन्ह आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here