पंतप्रधान मोदी ते विवेक ओबेरॉय व्हाया ड्रग्ज प्रकरणावर शिवसेनेचे मोठे भाष्य; वाचा, काय म्हटलंय सामनात

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज बॉलीवूडची बदनामी आणि चालू असलेल्या घडामोडी प्रकरणी भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

गेल्या काही महिन्यांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलावंतांवर रस्त्यावर भाजी, फळे वगैरे विकण्याची वेळ आली. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काही लहान-मोठे कलाकार, तंत्रज्ञ वगैरेंनी जिवाचे बरेवाईट करून घेतले. हे चित्र काही चांगले नाही. मनोरंजन उद्योगाला आधार देण्याची ही वेळ आहे. त्याऐवजी महाराष्ट्राशी बेइमानी करणारे काही आपमतलबी मनोरंजन उद्योगावर घाव घालीत आहेत. सुशांत राजपूत या कलावंताची आत्महत्या दुर्दैवी आणि धक्कादायक आहे; पण त्याच्या प्रेतावरचे लोणी खाऊन छोटय़ा पडद्यावर जो नंगानाच केला जात आहे तो असह्य आहे. बॉलीवूडचे पाच-दहा प्रमुख लोक येथे बसून पाकिस्तानचा अजेंडा चालवत आहेत असे स्वतःच्या मालकीच्या चॅनेलवरून भुंकले गेले. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एकंदरीत 32 प्रमुख लोक या भुंकणाऱयांविरोधात आता न्यायालयात गेले व न्यायालय याबाबत योग्य तो निकाल देईल. बॉलीवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच

खोटारडेपणा

मोठय़ाने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले? विवेक ओबेरॉयच्या घरावर बंगळुरूच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे. विवेक महाशय हे भाजप गोटातले म्हणून ओळखले जातात व पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉयने साकारली होती. या सर्व ‘ड्रग्ज’ प्रकरणाशी विवेक ओबेरॉयचा संबंध असेल किंवा आहे असे आम्ही म्हणणार नाही; पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही. यानिमित्ताने बॉलीवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. बॉलीवूडला बदनाम करायचे, खच्चीकरण करायचे व हा उद्योग इथून हलवायचा असे मनसुबे काहींनी रचले असतीलच. एका परीने महाराष्ट्राची, मुंबईची ओळख संपवायची असे काहीतरी बंद पडलेल्या पडद्यामागून सुरू आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, पण मनोरंजन उद्योगाचीही राजधानी आहे. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली व त्यांना दिलासा दिला हे योग्यच झाले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलीवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here