BLOG : शेतकऱ्यांचा संघर्ष है प्रचंड; सगळेच वाहून गेल्यावर कुठे काय दिसणार..?

सध्या राज्यभरात अतिवृष्टीने शेतकरी आणि सर्वचजण हैराण झालेले आहेत. अशावेळी सरसकट मदत न करता पंचनामे करून मदतीचे कागदी घोडे महाविकास आघाडीचे सरकारही नाचवत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा व्यावसायिकांना सरसकट मदत करणारे केंद्र आणि राज्य सरकार अशावेळी नियमांची अडकाठी घालून आणखी जास्त अन्याय करते. त्यावर पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या ब्रम्हा चट्टे यांनी आपल्या मनातील भावना फेसबुकवर व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या मनातील ही प्रातिनिधिक भावना असल्याने आम्ही त्याला जशीच्या तशीच प्रसिद्धी देत आहोत.

नुकसानीचा पंचनामा करायला नुकसान झालेले पिक दिसावं लागतं. शेत वाहून गेले तर पीक कुठे दिसणार ? पावसाच्या माऱ्याने जनावरे जाग्यावर मरून पडली आहेत. तर बरेच गाई गुरे पाण्यात वाहून गेली आहेत. पावसाने मेलेल्या जनावरांचा पंचनामा केला तरी मदत मिळण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला जातो. जनावरे वाहून गेली आहेत यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट तरी कुठून आणणार ?

न भूतो न भविष्यती हे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ खडबडून जागे होऊन पुरात अडकलेल्या मदत करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्ष कोरडा दुष्काळ सहन करणाऱ्या भागामध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. पेरू, शिताफळ, पपई, द्राक्ष, बोर, आंबा, डाळिंबाच्या बागा कोलमडून पडल्या आहेत तर मिर्ची, टोमॅटो, सिमला मिरची यासारख्या तरकारी पिके जमीनदोस्त झाली आहेत. कांद्याची रोपे वाहून गेली आहेत. कांद्याची लागवड केलेले रान वाहून गेले आहेत.

कापूस भिजलाय. उडीत, मूग सोयाबीनला मोड आलेत. नदीकाठचा ऊस वाहून गेलाय तर इतर ठिकाणचा ऊस जमीनदोस्त झालाय. वाडवडिलांनी बांध बंदिस्त केलेले क्षेत्र वाहून गेला आहे. घरात पाणीय. दारात पाणीय. रानात पाणीय. डोळ्यात तर फक्त पाणीच आहे. होत्याच नव्हतं झालय. तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करायला हवा आहे. शेती पिकाच्या नोंदीप्रमाणे सरसकट मदत करणे अपेक्षीत आहे.

लोक कल्याण राज्य व्यवस्थेमध्ये एखादी आपत्ती आली तर त्या आपत्तीचा फटका बसलेल्या घट्काला मदत करणे हे शासन व्यवस्थेचे आद्यकर्तव्य आहे. मायबाप सरकारला पाझर फुटेल अशी आशा करुयात. नाही तर नव्या संघर्षाला तयार होवूयात. बचेंगे तो और भी लढेंगे ! संघर्ष आपल्या पाचवीला पुजला आहे !

संपादन : सचिन मोहन चोभे

https://www.facebook.com/photo?fbid=2525277287597166&set=a.106052962852956

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here