शेतकऱ्यांच्या पोरांनी घातली ठाकरे सरकारला साद; पहा काय म्हणतायेत ते

सध्या राज्यभरात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ याचे संकट कोसळले आहे. अशावेळी सरकारी यंत्रणा नेहमीच्या थाटात आपल्याच वेगाने कागदी घोडे नाचवीत आहे. त्याकडे लक्ष वेधतानाच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी पुत्रांनी केली आहे.

फेसबुकवर पत्रकार आणि शेतीमध्ये नवीन प्रयोग करीत असलेल्या ब्रम्हा चट्टे यांनी सरकारला आवाहन केले आहे की, सगळ्याच पक्षाचे झेंडे घेवून फिरणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांनो ! सरसकट मदतीची मागणी लावून धरा ! पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवायला प्रशासन तरबेज आहे. सरकार आघाडीचे असो या बिघाडीचे. घोडीला घोडा लावण्यात प्रशासन माहिर आहे. पक्षिय भेद विसरून बापाच्या मदतीसाठी एक व्हा !  सरकारने आता भाषणापेक्षा थेट सरसकट मदत द्यावी ! ते सरकारचे कर्तव्य आहे ! ओला दुष्काळ जाहीर करून नैसर्गिक आपत्ती घोषित करा ! शिवरायांचा दाखला उठता-बसता देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शिवरायांसारखा राज्यकारभार करत असल्याचे दिसू द्यावे. बलिराजाला साथ द्या !

कर्जत (जि. अहमदनगर) येथील प्रवीण अनभुले यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टी आणी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून राज्य सरकारने नुकसानग्रस्त लोकांना आर्थिक मदत जाहीर करावी.तसेच गरज असेल तिथं ओला दुष्काळ जाहीर करुन पुढील उपाय योजना कराव्यात.विरोधीपक्ष देखील केंद्राकडून पॅकेज मागण्या ऐवजी राजभवनवर जातील निवेदन घेऊन.केंद्राकडून कसलीही अपेक्षा न ठेवता राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत.

अशाच पद्धतीने हजारो ग्रामीण तरुणांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. आता हे सरकार याकडे लक्ष देते किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here