पुरामुळे ‘इथे’ झालीय वाताहत; पहा काय करीत आहे सरकारी यंत्रणा

राज्यभरात सध्या परतीच्या मॉन्सून पावसाने कहर माजवला आहे. उभी पिके उद्धवस्त करण्यासह राज्याचे मोठे आर्थिक नुकसान करण्यामध्ये हे अस्मानी संकट व्यक्त आहे. अशावेळी अनेक भागात पावसाने आणि पुराच्या पाण्याने पुरती वाताहत झालेली आहे. तर अशावेळी सरकारी यंत्रणेने कार्यक्षमपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत.

परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात सर्वदूर वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी वाताहत झालेली आहे. विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून सोलापूर जिल्हयात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन जिल्हयातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु  आहे.

या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेणे सुरु केले आहे. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच,  त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहेत, असे प्रेसनोटमध्ये म्हटलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here