तर राज्यपालांची उंची, सन्मान वाढला असता; शिवसेनेचे शालजोडे

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावर तसेच भाजपच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम आहे असे चार तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी सांगतात व त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वा न करता भाजपवाले व त्यांचे राज्यपाल मंदिरे उघडा, गर्दी झाली तरी हरकत नाही, असा घोषा लावतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. रेस्टॉरंट उघडले ते नियमांचे कोटेकोरपणे पालन करून. देवांना बंद करून ठेवायला कुणाला आनंद वाटत नाही; पण एकदा मंदिरात प्रचंड गर्दीचे लोंढे आले की कोरोना संक्रमणाचे लोंढे वाढतील यावर देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. भाजपास प्रार्थना स्थळे उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटायला हवे व त्याबाबत संपूर्ण देशासाठीच एक राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. तेच योग्य ठरेल. मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे का उघडत नाहीत? तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला आहे काय? असे प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवल्याचे दिसत नाही. देशातील अनेक प्रमुख मंदिरे बंदच आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठीच हे कटू निर्णय घ्यावे लागतात. आपले राज्यपाल भगतसिंग हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. गोवा ही खऱया अर्थाने देवभूमीच आहे. मंगेशी, महालक्ष्मी, महालसा अशी सर्व देवस्थाने गोव्यात आहेत. गोव्याचे राजकारण, अर्थकारण मंदिरे व इतर प्रार्थना स्थळांवरच सुरू असते. गोव्यातही रेस्टॉरंटस् चालू आणि मंदिरे तशी

कुलूपबंदच

आहेत. काही छोटी मंदिरे उघडायला तेथे परवानगी देण्यात आली असली तरी मंगेशी, महालसा, महालक्ष्मी, श्री कामाक्षी संस्थान ही मोठी देवस्थाने बंदच आहेत. आता तर कामाक्षी देवस्थानातर्फे साजरा होणारा प्रसिद्ध दसरा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. कारण उघड आहे. ही सर्व भक्तांची मोठी गर्दी होणारी मंदिरे आहेत. भक्तांची गर्दी वाढून कोरोनाच्या विळख्यात सामान्य जनता सापडू नये हाच विचार ही मंदिरे बंद ठेवण्यामागे असणार हे स्पष्ट आहे. हीच भूमिका महाराष्ट्र शासनाचीदेखील आहे. मग मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? हे असले सवाल-जवाब फक्त महाराष्ट्रातच सुरू आहेत. कारण येथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती. भारतीय जनता पक्षाचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. या पदाची एक प्रतिष्ठा व शान आहे तशी ती मुख्यमंत्री पदाचीही आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे.

हिंदुत्वाचा अपमान करणाऱया, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱया एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? इतकेच कशाला, भाजपचे ‘मुखपत्र’ असलेल्या एका वृत्त वाहिनीचे तुघलकी मालक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत घाणेरडे हल्ले करतात हा मुख्यमंत्री या लोकनियुक्त संस्थेचा अपमान आहे, असे वाटून त्या भाजपाई तुघलकाची कानउघाडणी केली असती तर राज्यपालांची उंची, सन्मान वाढला असता. पण गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here