म्हणून भाजपने केली राज्याच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; वाचा, काय घडला प्रकार

मुंबई :

मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेवरून राज्यात राजकारण चालू आहे. मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरभागांमधील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे देशाचे अर्थकारण चालवणाऱ्या मुंबईला मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच महाविकास आघाडीसरकारवर यावरून टीका करण्यात आली. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ‘मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही’, असे विधान केले होते. याच पार्श्वभूमीवर ‘इतक्या मोठया घातपाताबाबत अंधारात राहिल्याबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यायला हवा’, असे म्हणत भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

भातखळकर म्हणाले की, राज्याचे ग्रीडफेल मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी झालेल्या ग्रीडफेलमागे घातपात असल्याचा दावा केला आहे. हे सत्य मानले तर लाखो लोकांना त्रासदायक ठरलेल्या आणि दोन जणांचा बळी घेणाऱ्या इतक्या मोठया घातपाताबाबत अंधारात राहिल्याबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यायला हवा.

यापूर्वीही त्यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. ‘मुंबई आणि परिसरातील खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी २८ तासांचा प्रदीर्घ कालावधी लागल्यावर वीजमंत्र्यांना आता घातपाताचा संशय येऊ लागला आहे… खरंतर महाविकास आघाडी सरकार हाच राज्यात झालेला सर्वात मोठा घातपात आहे’, असे भातखळकर यांनी म्हटले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here