मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत आज वाढ; वाचा, आजचे दर

मुंबई :

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. एकूणच सोन्याची भाव घसरल्यामुळे सोने खरेदी करण्यास मागील काही दिवसांत सुवर्णसंधी होती. आता मात्र सोन्याचे भाव चढू लागले आहेत. मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 50 हजार 245 रुपयांवर सोन्याचे दर होते, आज 50 हजार 369 रुपये सोने झाले आहे. सकाळी 10 वाजता 131 रुपयांच्या वाढीसह सोनं 50 हजार 376 रुपयांवर ट्रेड करत होता. फेब्रुवारीच्या सोन्याच्या किंमतीही 202 रुपयांनी वाढल्या.

डॉलरमध्ये आलेली कमजोरी, अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता त्याचप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेजी आली आहे, असं मत एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी व्यक्त केले.

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत कमी होऊन 52 हजारांच्या खाली आली होती. या दरम्यान चांदीचे दर 875 रुपयांनी उतरले होते. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 52 हजार 122 रुपये होते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1919 डॉलर होता तर चांदीची किंमत 24.89 डॉलर प्रति औंस होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here