धक्कादायक; फडणवीसांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीनंतर ‘या’ भाजप नेत्यालाही जीवे मारण्याची धमकी

मुंबई :

जळगाव जिल्ह्यात ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. या कार्यक्रमस्थळी बॉम्ब ठेवला आहे. 1 कोटी रुपये द्या, अशी खंडणीची धमकी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आली होती. यानंतर आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून जीवे मारण्याच्या धमकीचे तब्बल दहा फोन आले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर दोन संशियीतांना मुंबईच्या मुंब्रा या भागातून पोलिसांनी अटक केली आहे.

भाजप नेत्यांना धमकीसत्र सुरु झाले की काय, अशी शंका आहे. फडणवीस यांच्या कार्यक्रमात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली मात्र तरीही न घाबरता कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम संपल्यानंतर गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर शेलार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. दहा वेगवेगळ्या क्रमांकाच्या फोनवरून धमकी दिल्याने हा निश्चितच गांभीर्याने घेण्याजोगता प्रकार आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शेलार यांना धमकीचे फोन आले. मोठे नेते बनू नका, नाही तर ठार मारू अशा शब्दांत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा मुंब्रा येथून धमकीचे फोन आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here