‘त्यावेळी’ त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते; अमृता फडणवीस यांनी साधला निशाणा

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले. यावरून ‘माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही’ अशा शब्दात ठाकरे यांनीही कोश्यारी यांना सुनावले. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर  ‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध आजवर अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून वेळोवेळी भूमिका घेतली आहे.

नेमकं का म्हणाले होते राज्यपाल :-

तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे?

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर :-

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here