खडसेंच्या ‘त्या’ निर्णयावर फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले…

जळगाव :

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. ते पक्षांतर करणार असल्याच्या वावड्या नेहमीच उठत असतात. मात्र यावेळी खडसेंनीच मनावर घेतल्याने ते पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे फायनल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे. खडसे अनुभवी आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील’, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य केले.

नेमकं स्पष्ट न बोलता फडणवीस यांनी या प्रकरणावर अधिक आणि स्पष्ट बोलण्याचे टाळले. फडणवीस यांच्यामुळेच खडसे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना साद घातली होती. ‘एकवेळ चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यांसमोर (चॅनेल) जाऊ नका’, अशी विनंती त्यांनी खडसेंना केली होती.   

येत्या शनिवारी खडसेंविषयींच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये 17 ऑक्‍टोबर रोजी प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here