आज मुंबईला यलो अलर्ट जारी; राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

मुंबई :

महाराष्ट्राला सध्या परतीच्या पावसाने झोडपलं आहे. अतिवृष्टी आणि मौसमी पावसाने बेहिशेबी नुकसान केले आहे. आता काही पिके काढणीला आलेली होती, त्या पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची लागण करणे शक्य नाही. अशातच दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

आज मुंबईत पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जरी केला गेला आहे. पुढील आठवड्यात 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह इतरही ठिकाणी पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितला आहे. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही पावसाने धुमाकूळ घातला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून यात एका २ वर्षीय बालकाचाही समावेश आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होण्याची शक्यता आहे’, असे स्पष्ट केले. मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पिके लागणी होणे गरजेचे होते मात्र कधीही बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके लागण शेतकऱ्यांनी थांबवली आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here