धक्कादायक : फडणवीसांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करू, ‘या’ भाजप नेत्याकडे मागितली 1 कोटींची खंडणी

जळगाव :

जळगाव जिल्ह्यात ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार, आमदार आणि अनेक पदाधिकारी हजर होते. दुपारच्या सुमारास कार्यक्रम सुरु होण्याआधी गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना मेसेज आला की, कार्यक्रमस्थळी बॉम्ब ठेवला आहे, 1 कोटी रुपये द्या. या मेसेजने काहीतरी अघटीत होऊ शकते. या मेसेजने कार्यक्रमस्थळी मोठी खळबळ उडाली.

नंतर तासाभराने जेव्हा कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात होती तेव्हा ‘पाच बजे तक एक करोड भेज दे, महाजन को बोल दे, नही तो बहोत बडा धमाका हो जाएगा. मालेगाव में मेरे आदमी खडे हैं नही तो तुम्हारी मर्जी’ असा अजून एक मेसेज आला. आता मात्र मोठी खळबळ उडाली.  

पण, या धमकीला न घाबरता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम संपल्यानंतर गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. बॉम्ब ठेवण्याची धमकी कुणी दिली असावी, या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here