‘सुखी माणसाचा सदरा म्हणजे नेमकं काय’; व्हायरल होतेय 18 हजार कोटींच्या मालकाची ‘जबरदस्त’ गोष्ट, वाचा अधिक

एखाद्या माणसाकडं 18 हजार कोटींची संपत्ती असेल, तर आयुष्यात त्याचं पुढचं स्वप्न काय असू शकतं ?काहीही असलं तरी तामिळनाडूच्या एका छोट्याच्या गावात जाण्याचं, गरीब मुलांना शिकवून त्यांना दोन वेळा जेवायला देण्याचं, गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळून टपरीवर एकत्र चहा पिण्याचं स्वप्नं तरी नक्कीच कोण बघत नाही…
पण वर्षानुवर्षं परंपरा आणि संस्कृतीचं शिंपण केल्यानं आपल्या मातीला प्राप्त झालेल्या सुगंधानं साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेतल्या एका माणसाला असं स्वप्नं बघण्यासाठी प्रवृत्त केलं आणि अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतल्या एका प्रचंड मोठ्या कंपनीचा मालक कॅलिफोर्नियातून थेट तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या माथलमपराई ह्या छोट्याशा गावात ‘शिफ्ट’ झाला…
श्रीधर वेम्बु. एका सामान्य तामिळ कुटुंबातला जन्म. पुढं IIT मद्रासचा विद्यार्थी ते झोहो कॉर्पोरेशन या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक, CEO आता माथलमपराईच्या छोट्याशा रस्त्यांवर साधा शर्ट आणि पारंपरिक शुभ्र ‘वेष्टी’ घालून सायकल चालवताना दिसतो. लॉकडाऊनच्या काळात मोकळ्या वेळेत लहान मुलांना शिकवण्याचा तीन मुलांपासून सुरू झालेला प्रयोग आता चार शिक्षक आणि 25 विद्यार्थ्यांपर्यंत आला आहे.पण आता हा केवळ प्रयोग राहिला नसून श्रीधर वेम्बु यांची नवीन ‘एज्युकेशनल स्टार्टअप’ झाला आहे. यातून मुलांना विनामूल्य शालेय शिक्षण आणि अन्न पुरवण्याचं मॉडेल हळूहळू तयार होतंय, ज्यात ग्रेड, मार्क, सर्टिफिकेट यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल…
मागच्या दीडेक वर्षांपूर्वीच श्रीधर यांनी कंपनीच्या मिटिंग मध्ये कंपनीचं मुख्य कार्यालय इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला, आणि हे ऐकून सगळे अवाक झाले. कारण कार्यालय न्यूयॉर्क किंवा सिएटल ला होणार नसून भारतातल्या तामिळनाडूच्या माथलमपराई या छोट्या गावात शिफ्ट होणार होतं. त्यासाठी तिथं त्यांनी 4 एकर जागा आधीच विकत घेतली होती. त्यानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये, अगदी एक वर्षापूर्वी, श्रीधरने टँक् जिल्ह्यातील माथलमपराई गावात झोहो कॉर्पोरेशन जागतिक मुख्यालय सुरू केलं. एवढंच नाही तर, गेल्या वर्षी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व्यवसायात 3,410 कोटी रुपयांचा विक्रममी महसूल मिळवून सगळ्यांना चकित केलं.
खरंतर कॅलिफोर्निया ते माथलमपराईचा 13000 किलोमीटरवर येण्याचा निर्णय एका रात्रीतून आला नव्हता. एका मुलानं स्वतःला दिलेल्या शब्दाला प्रामाणिकपणे पाळण्यातून आला होता.झोहोला व्यवसायात यश मिळाल्यास तो देशात नफ्यातला मोठा वाटा गुंतवेल आणि गावातल्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी कंपनीचा नफा खर्च करेन, असा शब्द श्रीधर यांनी दिला स्वतःला दिला होता.या उद्देशानं त्यांनी माथालंपराय गावात मुलांसाठी एक विनामूल्य आधुनिक शाळा सुरू केली आहे, आणि स्वतःला तिथं जाऊन शिकवत आहेत.सायकल वर फिरत, लहान मुलांबरोबर खेळत आपल्या 
आयुष्याचा नवीन अंक आनंदानं जगत आहेत…
श्रीधर यांच्या मते येत्या काही वर्षांत ते भारतातल्या खेड्यांमध्ये सुमारे 8000 तंत्रज्ञानाच्या नोकर्‍या उपलब्ध करुन देतील आणि देशातल्या शहरी भागातल्या जागतिक सेवा स्थलांतरित करतील.  शिक्षणाबरोबरच तिथं आधुनिक हॉस्पिटल, सीवरेज सिस्टीम, पाणी, सिंचन, बाजारपेठ आणि कौशल्य केंद्रे स्थापन करतील…देशभरातला एकही न्यूज चॅनेल किंवा त्यांचे किंचाळणारे अँकर याबद्दल किती बोलतील माहिती नाही, पण देश अशा लोकांमुळं समृद्ध होणार आहे…

(टीप – हा लेख समाजमाध्यमांवर व्हायरल निनावी होत आहे. या लेख लिहिणाऱ्या लेखकाचे नाव कळल्यास आम्हालाही कळवा. ज्याचं क्रेडीट त्यांला मिळायला हवं.)

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here