गरीबांसह शेतकऱ्यांचं जीवन सोपं बनवणं हा बाळासाहेबांच्या जीवनाचा मूळ मंत्र : पंतप्रधान मोदी

प्रवरानगर :

लोकनेते पद्मभूषण दिवंगत डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. यावेळी ‘मी राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा परिवार आणि अहमदनगर यांच्या सर्वांचे आभारी आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले. प्रत्येक गाव, गरिब आणि शेतकऱ्यांचे जीवन सोपं बनवणे, त्यांची दु:ख, त्रास कमी करणे हे बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूळ मंत्र होता’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, वाजपेयींच्या काळात मंत्री असताना देशातील अनेक भागात त्यांनी सहकार चळवळ वाढवली
सहकारासाठी त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्यासारखं आहे. बाळासाहेबांनी सत्ता आणि राजकारणातून समाज बदलण्यावर भर दिला. गाव आणि गरीबांच्या समस्यांवर त्यांनी भर दिला. त्यांचे वेगळेपण त्यांच्या याच विचारात होते. म्हणूनच सर्व पक्षात त्यांचा आदर केला जात होता.

प्रकाशन सोहळ्याचा मुख्‍य कार्यक्रम सोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्‍न होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं हे अभावानेच दिसतं. बाळासाहेब विखेंचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं.

‘आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here