तर ते सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल; शिवसेनेने ‘त्यांच्यावर’ साधला नेमका निशाणा

मुंबई :

आरे कारशेड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील, असे सांगत त्यांनी मोठी घोषणा केली. या विषयावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात भाष्य केलेलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

गंगा शुद्धीकरण हा श्रद्धेचा तितकाच पर्यावरणाशी निगडित विषय आहे. गंगा शुद्धीकरणासाठी जपान सरकारची मदत घेतली जात आहे. निसर्गाचे आपण देणे लागतो, असे यावर पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे व ते योग्यच आहे. मात्र मुंबईतील जंगलतोड करून आपण काय मिळवले, यावर कोणाकडे उत्तर नाही. शहराच्या मध्यभागी एक जंगल असणे ही मुंबईसाठी भल्याची गोष्ट आहे. ते असे उद्ध्वस्त करणे हे क्रौर्यच आहे. हवामान बदलाच्या संकटाने जगासमोर संकट निर्माण झाले. ते माणसाने निसर्गाशी वैर निर्माण केल्यामुळेच झाले. ‘मेट्रो’ कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरच्या सपाट मैदानावर नेली यावर विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही. जंगल वाचवणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही. म्हणून आरे आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यायचे ठरवले आहे.

राजकीय गुन्हे अनेकदा मागे घेतले जातात; पण पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱयांना आजन्म गुन्हेगार ठरवले जाते. खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी सरळ केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱयांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली. पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रातील वृक्ष, वेली, नद्या, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, कडेकपारी आज आनंदाने बहरून निघाली असतील. हा आनंद चिरकाल टिको!

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here