‘त्यावरून’ विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही; शिवसेनेचा टोला

मुंबई :

आरे कारशेड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील, असे सांगत त्यांनी मोठी घोषणा केली. या विषयावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात भाष्य केलेलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

विरोधकांचे म्हणणे असे की, कारशेड आरेतून कांजूरला नेल्यास चार हजार कोटींचा जादा भुर्दंड सोसावा लागेल. प्रत्येकाचे आकडे वेगळे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली माहिती अगदी वेगळी आहे. कांजूरला कारशेड उभारताना सरकारला खर्च येणार नाही. कांजूरची जागा सरकारचीच आहे. त्यामुळे त्या जमिनीसाठी एक छदामही मोजावा लागणार नाही. पुन्हा ‘आरे’त जी इमारत वगैरे उभी केली आहे असे सांगतात ती इमारत इतर सरकारी कार्यासाठी वापरली जाईल. सरकारने यापूर्वी आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता 800 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. जगात सर्वत्र जंगलांवर अतिक्रमण सुरू असताना जंगलांची व्याप्ती वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. निसर्गप्रेमींसाठी हा निर्णय आशादायक आहे. आरे प्रकरणात पर्यावरणपेमींचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी केले होते. तेव्हा ते मंत्रिमंडळात नव्हते. आज ते राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत. त्यामुळे ‘आरे’चे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री कोणती पावले उचलणार, असे प्रश्न विचारले गेले; पण ‘ठाकरे’ शब्दाला पक्के असतात. देश आणि राज्याच्या हिताच्या प्रश्नी ते कोणतीही तडजोड करीत नाहीत हे या निर्णयाने स्पष्टच झाले. सर्वत्र निसर्गाचा ऱहास सुरू झाला आहे. डोंगर कापले जात आहेत. झाडे तोडली जात आहेत. नद्या, नाले, समुद्र भराव टाकून व्यापार केला जात आहे. वाळूचा बेकायदा उपसा हा चिंतेचा विषय ठरत आहे.

गंगा शुद्धीकरण

हा श्रद्धेचा तितकाच पर्यावरणाशी निगडित विषय आहे. गंगा शुद्धीकरणासाठी जपान सरकारची मदत घेतली जात आहे. निसर्गाचे आपण देणे लागतो, असे यावर पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे व ते योग्यच आहे. मात्र मुंबईतील जंगलतोड करून आपण काय मिळवले, यावर कोणाकडे उत्तर नाही. शहराच्या मध्यभागी एक जंगल असणे ही मुंबईसाठी भल्याची गोष्ट आहे. ते असे उद्ध्वस्त करणे हे क्रौर्यच आहे. हवामान बदलाच्या संकटाने जगासमोर संकट निर्माण झाले. ते माणसाने निसर्गाशी वैर निर्माण केल्यामुळेच झाले. ‘मेट्रो’ कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरच्या सपाट मैदानावर नेली यावर विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here