‘CM ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’; ‘या’ पक्षाचे आव्हान

मुंबई :

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विविध विषयांना घेऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनासह  शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते रेल्वे सुरू करण्यापर्यंत अशा अनेक विषयांवर भाष्य केले. पण यातलं काहीच कळलं नसल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच त्यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’. असे म्हणत ठाकरेंना लक्ष्यही केले.

पुढे देशपांडे म्हणाले की, राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात 21 ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांना गर्दी नको असेल तर त्यांनी घरातच थांबावं. मात्र, सर्वसामान्य जनतेला कामावर जायचं आहे. बँकेचे हफ्ते भरायचे आहेत. याकडे लक्ष कोण देणार?, असा सवालही यावेळी देशपांडेनी उपस्थित केला आहे. आता मनसेने केलेल्या या टीकेला आणि प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here