असा बनवा अस्सल कोकणी पदार्थ ‘चिकन पोतेंडी’; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

हा कोकणातील अस्सल पदार्थ, जास्ती करून नॉर्थ कोकणमध्ये बनवला जातो. सहाजिकच, केळीच्या बागा, भात शेती, नारळ उत्पन्न जास्त आणि त्यामुळे अनेक पारंपरिक पदार्थांमधे तांदळाचे व ओल्या नारळाचे प्रमाण अधिक, तसेच केळीच्या पानांचा वापरही जास्त… त्यातलाच फुल मिल प्रकारात येणारा एक पदार्थ म्हणजे पोतेंडी..!

खुपच पौष्टिक, विटामिन-प्रोटीन यांनी संतुलित अशी हि पोतेंडी सिझनल भाज्या, मासे यांना सामावून घेण्याचा एक उत्तम पर्याय… पोतेंडीही अनेक प्रकार आहेत. जे कोकणात खायला भेटतात. “केळफुल आणि बोंबील पोतेंडी” खास फेमस.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 7-8 केळीची कोवळी पाने
 • 1 वाटी चिकन खिमा
 • 1/2 टी स्पून लाल तिखट
 • 1 वाटी तांदळाचे पीठ
 • 2 वाटी पाणी
 • 2 टेबल स्पून तुप
 • 1/2 वाटी वाल पापडीचे दाणे
 • 1/2 वाटी किसलेला ओला नारळ
 • 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 1/2 वाटी चिरलेला पाती कांदा
 • 5-6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 3 टेबल स्पून तेल
 • 1/4 टेबल स्पून हळद
 • चवीनुसार मीठ

आता हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय करा सुरुवात बनवायला…

 1. प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात २ वाटी पाणी उकळवून त्यात २ चमचे तुप व चिमुटभर मीठ घालून, पाण्याला चांगली उकळी फुटली कि, मग १ वाटी तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवावे व गॅस बंद करुन तांदळाच्या पीठाची उकड काढून घ्यावी; दुसरीकडे एका कढईमधे तेल गरम करुन त्यात चिकन खिमा, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून शिजवून ठेवावे आणि इतर सर्व वस्तू चिरुन, साफ करुन ठेवाव्यात.
 2. उकड गरम असतानाच त्यामध्ये शिजवलेला चिकन खिमा, पाती कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, ओला नारळ, वाल पापडीचे दाणे, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण ५-६ मिनीटे झाकून ठेवावे.
 3. नंतर त्या मिश्रणातून एक गोळा घेऊन, चित्रात दाखवल्याप्रमाणे केळीच्या पानावर भाकरी थापून, चारही बाजूंनी पानाची घडी घालावी. अशाप्रकारे सर्व भाकरी पाने तयार करावी.
 4. आता तवा गरम करुन त्यावर तयार भाकरी पान शेकण्यासाठी ठेवावे (शेकताना पानावर ताटली ठेवून त्यावर खलबत्ताचे वजन ठेवावे) अशाप्रकारे चित्रात दाखवल्याप्रमाणे केळीची पाने दोन्ही बाजूंनी खरपूस ब्राऊन शेकावी.
 5. गरमागरम पोतेंडी खाण्यासाठी तयार…

संपादन : संचिता कदम    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here