हेच कल्चर आहे ना आपलं.. होय, ढोंग सोडा.. वास्तव मान्य करा.. आणि बदला यार..!

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार यांच्या राजकीय बातम्या येतातच. पण महिनाभरात ही राज्ये बलात्कार नावाच्या वास्तववादी बातम्यांमुळे चर्चेत आहेत. होय, दुर्दैवाने हेच आपले वास्तव आहे. म्हणे आमचे कल्चर लैच बेस्ट आहे. डोंबलाचे बेस्ट. जातीयवाद आणि धार्मिक विखार हे वास्तव आहेच. पण बायकांना भोगवस्तू समजण्याची मध्ययुगीन मानसिकताही या कल्चरमध्ये फोफावत आहे.

आता तुम्ही म्हणाल की मग परदेशात काय अशा घटना घडत नाहीत का? होय, घडतात की.. पण त्यांच्याकडे घडतात म्हणून आपल्याकडे घडते ते योग्य होत नाही. त्यातही पाकिस्तान, सिरीया, इराक यांचे आपल्याला काय देणेघेणे असायचा संबंध नाही. आपण तुलना करूयात योरोपाची, जपानची आणि अमेरिकेची. तिथेही घडतात अशा घटना. पण तीव्रता आणि वारंवारिता आपल्याकडे असते तितकी मोठी आहे का?

मित्र-मैत्रिणींनो, आपण हॉलिवूडचे सिनेमे पाहतो. बॉलीवूडचे पाहतो आणि टॉलिवूडचेही. आता आठवा बरे कोणत्या सिनेमात बलात्काराचे सीन जास्त दिसतात. रोमान्स सोडा. तोही आपल्याकडे जास्तच दिसतो. पण प्रेम ही गरज आहे जगण्याची. पण वासनांधता कोणत्या सिनेमात जास्त दिसते. अगदी मराठी सिनेमे आठवा. बलात्काराचा सीन ही गरज असते स्क्रिप्टची. कारण, सिनेमा वास्तवाला भिडतो. समाजाचा आरसा दाखवतो.

परदेशातील (आपण पाहत असलेल्या देशातील) सिनेमात शक्यतो बलात्काराचे सीन नाही दिसत. कारण, तिथे ते एकमेकांना डेटिंगला जाऊयात का हे सहजतेने बोलतात आणि ‘नाही’ म्हटले की तो किंवा तिचा नाद सोडून नव्या व्यक्तींना साद घालतात. आपल्याकडे हे इतके सोपे नाही. आपल्याकडे ‘ती’ला एकतर तुम्ही सहजतेने ‘ते’ विचारूच शकत नाहीत. ‘ती’चीही तऱ्हा तीच असते. ‘ती’ही त्याला अशी मनमोकळी साद घालू शकत नाही. कारण, आपले कल्चर अर्थात संस्कृती आड येते की..!

बालिशपणा काहीकेल्या आपला जात नसल्याचे हे लक्षण आहे आणि त्यामुळे बलात्कार हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे वास्तव बनले आहे. हाथरस, खैरलांजी किंवा अशाच एखाद्या ठिकाणी बाईवर अत्याचार झाला की आपण पेटून उठतो. फाशी देण्यासह गोळ्या घालण्याची आणि गेलेटावर चढवण्याची भाषा करतो. पण त्याचवेळी आपले आमदार, खासदार, सरपंच, नेते, अधिकारी आणि गुंड आपल्या सभोवतीच्या आया-बायांना काय वागणूक देतात हेही आपण उघड्या डोळ्यांनी बघून शांत राहतो की. राजांनी (अधिकार पदावरील व्यक्ती) कितीही अन्याय केला तरी गप मारण्याची शिकवण दिलीय ना आपल्याला या संस्कृतीने..!

कालही एक बातमी वाचली उत्तरप्रदेश राज्यात हाथरस प्रकरणावरून ‘जीवावर उदार’ झालेल्या राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने म्हणे पोटनिवडणुकीत एका बलात्काराचा आरोप असलेल्या ‘नेत्या’ला उमेदवारी दिली. त्याला विरोध करणाऱ्या महिला कार्यकर्तीला २५ पुरुषांनी भरसभेत बेदम मारहाण केली. अरे काय चाललेय या देशात. काँग्रेस त्यातलीच आहे असे नाही. भाजप असो की इतर छोटे-मोठे राजकीय पक्ष असोत. त्यांचेही हेच वास्तव आहे की..!

हेच वास्तव आहे म्हणून आपण असेच जगावे असेही काही नाही. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. आपणही सकारात्मक बदल स्वीकारायला पाहिजेत. आताही आपण नैतिकतेच्या गप्पा मारताना कुटुंबात, गावात, शहरात, कार्याकालयात, आपल्या राजकीय पक्षात आणि मुख्य म्हणजे देशात महिलांवर अत्याचार होतच आहेत की. आपण त्यावर काहीतरी बोलणार आहोत की नाही.. का फ़क़्त अत्याचार झालेली महिला कोणत्या राज्याची आहे, कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या जाती आणि धर्माची आहे त्यावरून च्युझी पद्धतीने व्यक्त होणार. अरे असेच जगायचे असेल तर आत्महत्या करा.. कारण तुम्ही आणि मीही अगोदरच मग मनाने मेलेलो आहोत की..!

संस्कृतीच्या बोंबा मारण्याचे सोडून द्या. माणूस म्हणून आपण किती सकारात्मक विचारांचे आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणारे नागरिक बनलोय हे अंतर्मनात डोकावून पहा. जर आपल्याला दुसरा धर्म, जात, लिंग आणि प्रदेश यांच्याबद्दल किंचितही नकारात्मक भावना असेल तर माणूस बनण्याची तुमची प्रक्रिया अजूनही खूप लांब असल्याचे मनोमन समजून घ्या. च्युझी अजिबात होऊ नका. लैंगिकता ही भावना सर्वांच्या मनात असते. मात्र, त्यात वासनेचा विखार येऊ न देणे हेच माणूस असल्याचे लक्षण आहे. असे जर आपण करू शकत नसू.. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुटुंबातील कोणीही, जाती व धर्मातील कोणीही आणि राजकीय पक्ष यांच्यातील कोणीही असा असेल तर त्याला चांगल्या विचारांसाठी प्रेरित तरी करा..

किती दिवस महिलांना फ़क़्त भोगाची वस्तू समजणार आहात? हे दुर्दैव इतरांचे आणि तुमचे आणि माझेही आहे.. आपण जर असा बदल नाही घडवला तर यापुढेही बलात्कार घडतील आणि आपण फ़क़्त सोशल मीडियामध्ये नैतिक असल्याचे ढोंग करीत राहू.. अशावेळी आपण समाजाची नाही, तर स्वतःची फसवणूक करतोय आणि चुकतोय हे मनात पक्के ठेवा.. कारण, चूक ही चूक असते.. मग ती तुम्ही केलेली असो की मी केलेली.. कोणी केलीय यावर चुकीची गोष्ट अजिबात बरोबर ठरत नाही..

आणि हे वाचून जर बदलणार नसाल तर तुम्हाला शुभेच्छा.. कारण, माझ्यासारख्या मूर्खांना मग जगण्याचा तरी काय अधिकार आहे म्हणा. पहा विचारी माणसांच्या मरणाची वाट आणि महिलांना वागणूक द्या कस्पटासमान. कारण दुर्दैवाने तेच तर कल्चर आहे आपले..!

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२२१५६५८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here