तर अनेकांचे वस्त्रहरण होईल; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात उच्चशिक्षित तरुण, बेरोजगारी, व्यवसाय आणि आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यासंबंधित राजकीय नेत्यांना टोलाही हाणला आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

‘जिम’ उघडा असा तगादा या क्षेत्रातील लोक लावत आहेत. त्यांची वेदना कोणीतरी समजून घेतलीच पाहिजे. मंत्री, आमदार, खासदार वगैरे मंडळी विशेष काळजी व अंतर ठेवूनही त्यांना कोरोनाने गाठलेच आहे. तशीच काळजी आम्ही घेऊ, बाकी सगळे भगवान भरोसे, पण आम्हाला आता जिम, देवळे उघडू द्या. नाही तर देवावरचाच लोकांचा विश्वास उडेल, अशी एक भावना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना या सर्वच मुद्दय़ांना स्पर्श केला. मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. नवरात्र, दिवाळीसारखे सण-उत्सव जवळ येत असताना एक एक पाऊल जपूनच टाकावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले तेही खरेच आहे. शेवटी पालक म्हणून जनतेची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनीही योग्य खबरदारी घ्यायला हवी.

आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये 11 बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here