शिवसेनेचा रोकडा सवाल; ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात उच्चशिक्षित तरुण, बेरोजगारी, व्यवसाय आणि आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यासंबंधित राजकीय नेत्यांना टोलाही हाणला आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

‘मिशन बिगिन अगेन’मध्ये अद्यापि देव, मंदिरे, जिम, लोकल सेवा यांना स्थान मिळालेले नाही. ज्यांचा पुनश्च हरिओम झाला आहे, ते व्यवसायही पूर्णपणे उघडता आलेले नाहीत. रेस्टॉरंट, बार वगैरे उघडा, पन्नास टक्के क्षमतेने चालवा, असे सरकारने सुचवले; पण ते चालविताना पालिका, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांशी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे धंदा करणेच नको अशी मानसिकता व्यावसायिकांत निर्माण झाली, असे दिसत आहे. आता अनलॉक काळात राज्यातील काही हजार उद्योग उघडल्याचे सांगितले जाते, पण त्याचा लाभ किती लोकांना झाला? जर पन्नासेक टक्के लोकांच्या क्षमतेने उद्योग सुरू झाले असतील तर उरलेल्या पन्नास टक्के लोकांच्या उपाशी पोटाची, त्यांच्या पोराबाळांची काय व्यवस्था सरकार करणार आहे? या गरीब लोकांच्या घरात जे किडूकमिडूक होते ते आता संपले. त्यामुळे एकतर आत्महत्या करणे नाहीतर गुन्हेगारीचा मार्ग पत्करून जिवंत राहणे, हाच मार्ग त्यांच्यासमोर आहे. सरकार यापैकी कोणत्या मार्गास मान्यता देणार आहे? ही जबाबदारी फक्त राज्यांची नाही तर केंद्राचीसुद्धा आहे हे आधी मान्य केले पाहिजे. सीमेवर चीनचे 60 हजार सैनिक जमा झाले आहेत व आपले सैनिक त्यांना चोख उत्तर देतील, पण त्यामुळे गोरगरिबांच्या पोटापाण्याचे, रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत. लोकांना रोजगार हवा आहे. लोकांना जगायचे आहे. पोराबाळांना कसेही करून जगवायचे आहे. त्यासाठी तुमचा तो कायदा, नियम वगैरेही मोडायला लोक तयार झाले आहेत. ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली? मुंबई-महाराष्ट्रातील वाद्यवृंद, नाटय़ व्यवसाय, हॉटेलमध्ये गाणारे ‘ऑर्केस्ट्रा’ बंद पडले आहेत. देवळांचेही एक अर्थकारण आहेच. दानपेटय़ांची उलाढाल राहू द्या बाजूला, पण हार, नारळ, फुले, पेढे विकणारे, पुजारी, कीर्तनकार यांचे कसे चालायचे? याचा विचार कोणीतरी करावाच लागेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here