शिवसेनेचा सामनातून संभाजीराजेंना टोला; तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात उच्चशिक्षित तरुण, बेरोजगारी, व्यवसाय आणि आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यासंबंधित राजकीय नेत्यांना टोलाही हाणला आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे!

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर श्री. आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. राज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. पहिली घटना पिंपरी शहरातली आहे. पगारात भागत नसल्याने दोन उच्चशिक्षितांनी एटीएम मशीन फोडली व मोठी रक्कम लुटण्यात आली. दुसरी घटना नाशिकची आहे. सव्वादोनशे रुपये पगार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली. या दोन्ही घटना राज्यातील सध्याच्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. कोरोना व लॉक डाऊनचे हे ‘साइड इफेक्ट’ आहेत. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे. हे त्याचेच लक्षण आहे. कोरोनामुळे राज्यभरात जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. अनेक व्यवसाय, छोटे उद्योग, मोठे व्यवसाय टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ होत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here