काँग्रेस पक्षामध्ये वाढला तणाव; बलात्कारातील आरोपीला दिली उमेदवारी

बलात्कार झाल्यावर कोणी केला, कुठे झाला आणि संबंधित प्रकरणातील आरोपींचे जात आणि धर्म कोणते आहेत यावर कोणती भूमिका घ्यायची हे ठरवणाऱ्या बोगस लोकांच्या देशात काँग्रेस पक्षाने आणखी एक आगळीक केली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी देताना थेट बलात्कारातील आरोपीला ‘संधी’ देण्याचेमहान कार्य केल्याने काँग्रेस पक्ष आता टीकेचा धनी ठरत आहे. पक्षाने खायचे दात तर यानिमित्ताने दाखवले नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उत्तरप्रदेश येथील देवरियामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुकुंद भास्कर यांनी उमेदवारी दिली आहे. भास्कर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. या उमेदवारीला विरोध करणाऱ्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण करण्याचेही ‘कर्तव्य’ काँग्रेस कार्यकर्त्यांनी बजावले आहे. यामुळे पक्षातील तणावही वाढला आहे.

भास्कर यांना उमेदवारी देण्याला तारा यादव यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. त्यावर तारा यादव यांनी म्हंटले आहे की, एकीकडे प्रियांका गांधी आणि पक्षाचे नेते हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून लढाई लढत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे तिकीट एका बलात्कारी व्यक्तीला दिले जात आहे. पक्षाचा हा निर्णय पक्षाच्या प्रतिमेला मलीन करणारा आहे. त्यामुळे महासचिव प्रियांका गांधी काय कारवाई करणार, याची वाट पाहत आहे.

तारा यादव यांना मारहाण केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश काँग्रेसने एक कमिटी स्थापन करून दोन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. २५ लोक एका महिला नेत्याला मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाल्याने अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here