…तर अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल; वाचा, काय म्हटलंय आरोग्यमंत्री टोपेंनी

जालना :

सध्या महाराष्ट्रात कोरोना मृत्यू दर कमी होताना दिसत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. असे असले तरी कोरोनाबाधितांची संख्याही अद्याप कमी झालेली नाही. राज्यात नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होण्याच्या चर्चा सुरु असताना राजेश टोपे यांनी एक सूचक विधान करत या सर्व चर्चांना लगाम घातला आहे. ‘कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वयंशिस्त पाळलीच पाहीजे. अन्यथा अनलॉकचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागेल’, असा गंभीर इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. यावेळी ते जालना येथे बोलत होते.

पुढे बोलताना टोपे यांनी स्पष्ट केले की, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. शनिवारी एकूण अकरा हजार नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर, त्याच्या दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पण यानंतर नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क वापरले नाही, सोशल डिस्टंसिंग न पाळता संसर्ग पसरत राहिला, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल. म्हणजेच कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा वाढेल. त्यामुळे स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानेच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नागरिकांकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. त्यावर आमचं विचारमंथन चालू असतं, पण शिस्त पाळली आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा मर्यादित राहिला तरच नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार करता येईल.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here