शिवसेनेचा रोखठोक सवाल; ‘ते’ पैसे नक्की कुठून आले?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज रोखठोक या सदरात ‘30 हजार कोटींचा टीआरपी घोटाळा, 80 हजार फेक अकाऊंट्स’ याविषयी भाष्य करण्यात आले.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् समाज माध्यमांवर निर्माण केली. त्यात भर पडली ती एका ‘कर्कश’ वृत्तवाहिनीच्या टीआरपी घोटाळ्याची. मुंबई पोलिसांनी हे सर्व समोर आणले. पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नयेत.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसे वापरण्यात आले याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. याबाबत स्वतःला नैतिकतेचे पुतळे समजणारे लोक दुसऱयांना गुन्हेगार ठरवण्यासाठी स्वतः पांढरपेशी दरोडेखोर होतात व समाजातला एक वर्ग या दरोडेखोरीचे समर्थन करतो हे भयंकर आहे. अर्णब गोस्वामी व त्यांच्या कर्कश चॅनेलने सुशांत प्रकरणात ज्या आरोळ्या ठोकल्या त्या त्यांच्याच घशात मुंबई पोलिसांनी घातल्या. गोस्वामींचे ‘रिपब्लिक’ चॅनेल हा एक आर्थिक घोटाळा आहे व टीआरपी वाढावा यासाठी घरोघरी पैसे वाटले गेले हा खुलासा पोलिसांनी केला. काही वृत्तपत्रे घरोघरी फुकट वाटप करून विक्रीवाढीचा आकडा दाखवतात. त्यातलाच हा प्रकार, पण सुशांत प्रकरणात या चॅनेलचे किंचाळणे मतलबी होते. त्यामागे राजकीय षड्यंत्र होते.

महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री देशमुख व संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करून चिखलफेक करण्यासाठी पैशांचा वापर झाला. हे पैसे नक्की कुठून आले, त्यांचा बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आले पाहिजे, पण चोराच्या उलटय़ा बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना महाराष्ट्राने आता सोडू नये. हे झाले टीआरपी घोटाळ्याचे प्रकरण. दुसरे प्रकरण 80 हजार फेक अकाऊंटस्चे. तेही तितकेच भयंकर आहे. पोलीस आणि प्रशासन हे राष्ट्राच्या चार प्रमुख स्तंभांपैकीच एक आहेत. राजकीय फायद्यासाठी त्या स्तंभावरच घाव घालायचे ही मानसिकता धोकादायक आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर आणि इमानदारीवर या काळात मोठा हल्ला चढवला गेला. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आता आक्रमकतेने पुढे आले व संपूर्ण कटाची माहिती दिली.

सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त ‘फेक अकाऊंटस्’ उघडून पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतेक खाती तुर्कस्तान, जपान, इंडोनेशिया अशा देशांतून चालवली गेली हे समोर आले. हे सर्व कोणाच्या इशाऱयाने आणि मार्गदर्शनाखाली चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नाही. ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवले, मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतला न्याय वगैरे देण्याच्या भानगडीत त्यांना पडायचे नव्हते. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार व ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती. राजकारणात बदनामी आणि चारित्र्यहनन हेच सगळय़ात मोठे हत्यार आहे व सोशल मीडिया त्या हत्याराचा कारखाना बनला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here