मराठमोळे श्रीकांत दातार झाले ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे डीन; राज ठाकरेंनी केली ‘ही’ पोस्ट

मुंबई :

सकाळपासून माध्यमांवर तसेच समाजमाध्यमांवर हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी नियुक्त झालेल्या मराठमोळ्या श्रीकांत दातार यांचे कौतुक चालू आहे. एका मराठी माणसाची जागतिक दर्जा असलेल्या विद्यापीठाच्या अत्युच्च पदावर नियुक्ती झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रासाठी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषेसाठी, मराठी व्यावसायिकांसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये :-

जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्या तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.

श्री श्रीकांत दातार यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करुन गेला. चार्टर्ड अकाऊंटंट -आयआयएमएमधून व्यवस्थापनाचं शिक्षण – स्टेनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी-कार्नेजी मेलन येथे अध्यापन – पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेक स्कूलचे डीन.

या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयस विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा.

जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रीम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here