शिवसेनेचा स्पष्ट सवाल; आपण ‘त्या’ देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत काय?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज चीनच्या मुजोरपणाविषयी भाष्य करण्यात आले आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबींवर उहापोह केला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

शेजारी देशांच्या सीमांमध्ये घुसखोरी करणे, आंतरराष्ट्रीय कायदेकानून धाब्यावर बसवून लगतच्या देशांचे भूप्रदेश बळकावणे आणि अनेक देशांच्या सीमाभागांवर आपला हक्क सांगणे ही चीनची जुनीच खोड आहे. शी जिनपिंग हा शक्तिशाली नेता चीनचा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर तेथील कम्युनिस्ट राजवटीचा

विस्तारवादी हव्यास

अधिकच वाढला आहे. हिंदुस्थान सरकारने 1951ला चीनला राजकीय मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनला स्थान मिळावे यासाठी हिंदुस्थानने प्रयत्न केले. जागतिक व्यापार संघटनेत चीनला समाविष्ट करण्यासाठी हिंदुस्थाननेच पुढाकार घेतला. पण या उपकारांची जाणीव चीनला आहे काय? ‘वन चायना’ हा अजेंडा हाती घेऊन चिनी राज्यकर्त्यांचा घोडा बेलगाम सुटला आहे. चिन्यांसारखे मंगोलियन वंशाप्रमाणे दिसणारे नागरिक जिथे कुठे म्हणून राहतात तो सगळा प्रदेश चीनचा असे विस्तारवादी धोरण चीनने आखले आहे. त्यामुळेच हिंदुस्थानच्या गलवान खोऱयात चीनने घुसखोरी केली. संपूर्ण लडाखवर चीनचा डोळा आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडच्या पर्वतरांगांवरही चीन दावा ठोकतो. हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 27 देशांशी चीनचा सीमेवरून झगडा सुरू आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि प्रचंड शस्त्रसामर्थ्य या जोरावर ‘हैवान’ बनू पाहणाऱया चीनला तैवानच नव्हे, तर अनेक देशांच्या सीमा गिळंकृत करायच्या आहेत. चीनचे हे सगळे आडाखे पाहता हिंदुस्थाननेही तिबेटपासून तैवानपर्यंत तमाम धोरणांचा फेरविचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. हिंदुस्थानी मीडियाला तैवानवरून फर्मान सोडणाऱया चिन्यांना खडसावून आपण तैवानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत काय?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here