‘तो’ इशारा देण्याची तुमची हिंमतच कशी झाली; शिवसेनेचा ‘त्यांना’ सवाल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज चीनच्या मुजोरपणाविषयी भाष्य करण्यात आले आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबींवर उहापोह केला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

‘लोकशाही’ या चार अक्षरी शब्दाचा प्रचंड द्वेष करणारा चीन स्वतःच्या देशात कायमच लोकशाही मूल्यांचा गळा घोटत असतो ही बाब जगासाठी आता नवीन राहिली नाही. मात्र आता दुसऱया देशांतही लुडबुड करून तिथेही लोकशाही तत्त्वांना पायदळी तुडवून मुस्कटदाबी करण्याचे मस्तवाल प्रकार चीनने सुरू केले आहेत. ‘तैवान’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता न देणाऱया चीनने गुरुवारी तर तैवानवरून हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनाच ‘डिक्टेट’ करण्याचा अर्थात दम भरण्याचा प्रयत्न केला. 10 ऑक्टोबर हा तैवानचा राष्ट्रीय दिन आहे. यानिमित्ताने हिंदुस्थानातील माध्यमे तैवानविषयक बातम्या देतील हे गृहित धरून चीनने हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांना तैवानचा ‘स्वतंत्र देश’ म्हणून उल्लेख करू नये, असा इशारा दिला आहे. मुळात हिंदुस्थानी माध्यमांना असा हुकूम सोडण्याचा चिनी राज्यकर्त्यांना अधिकारच काय? पण दिल्लीतील चिनी दूतावासाने हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांना थेट पत्र पाठवून तैवानला स्वतंत्र देशाची वागणूक देऊ नका, असे फर्मानच सोडले. ”जगभरात चीनचे प्रतिनिधित्व केवळ चीनमधील ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन’चे सरकारच करते. चीन या नावाचा जगभरात आमचाच एकमेव देश आह़े त्यामुळे ‘रिपब्लिक चीन’ नावाच्या तैवानला हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी स्वतंत्र देश मानू नये,” असे चीनने हिंदुस्थानी मीडियाला बजावले आहे. खुद्द चीनमध्ये

वृत्तपत्रस्वातंत्र्य वगैरे शब्दांना

थारा नाही. ‘ग्लोबल टाइम्स’ हे कम्युनिस्ट राजवटीचे एकमेव सरकारी प्रसारमाध्यम जी माहिती देईल ती आणि तेवढीच माहिती जगापर्यंत पोहोचते. बाकी चीनमध्ये कुठे आणि काय सुरू आहे याची कानोकान खबर चीनबाहेर पडू शकत नाही. आपल्या देशात प्रसारमाध्यमांची अशी मुस्कटदाबी करणाऱया चीनने आता हिंदुस्थानातील मीडियालाही आपण सांगू तोच अजेंडा राबवण्यासाठी ‘सेन्सॉरशिप’ लादावी हे आक्षेपार्ह आहे. चीनच्या या फर्मानाला हिंदुस्थानी मीडियाकडून ‘खड्डय़ात जा’ असे प्रत्युत्तर मिळेल असे ट्विट तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले खरे, मात्र चीनच्या दूतावासाने राजधानी दिल्लीतून हे फर्मान जारी करूनही एरव्ही कर्णकर्कश आकांडतांडव करणाऱया वाहिन्यांनी यावर अद्याप आगपाखड केली नाही किंवा सरकारच्या वतीनेही अद्याप कुठला टिवटिवाट झाल्याचे ऐकिवात नाही. हिंदुस्थानी माध्यमांना अशा प्रकारे इशारा देण्याची तुमची हिंमतच कशी झाली, असा जाब चिनी राजदूताला आपल्या सरकारने विचारायला काहीच हरकत नाही. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here