संभाजीराजेंनी मंत्री वडेट्टीवारांला सुनावले; समाजात दुही माजवण्याचा…

मुंबई :

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून अनेक नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत आहेत. मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या खासदार संभाजीराजेंनी ‘तलवार उपसावी लागेल’ असे विधान केले. या विधानावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंना ‘राजा रयतेचा असतो… समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार?

तलवारीची भाषा का?’, असे सवाल केले. याच पार्श्वभूमीवर ‘मी तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळेप्रसंगी तलवार काढेन, असं वक्तव्य केलं. मात्र त्याचा विजय वडेट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका संभाजीराजेंनी केली.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ‘तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात मराठा समाज संतापलेला होता. राजे तुम्ही आम्हाला म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश होता. मात्र जमावाला शांत करण्यासाठी तुम्हाला तलवार काढण्याची गरज नाही ,वेळेप्रसंगी मी तलवार काढेन, असे मी म्हणालो.

राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, असे म्हणत त्यांनी वडेट्टीवारांला सुनावले.

नेमकं काय म्हणाले होते वडेट्टीवार :-

राजा रयतेचा असतो… समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार?

तलवारीची भाषा का?

तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात.

माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही.

मध्य मार्ग काढता येतो , मग हे राजकारण कशाला?

शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत.

एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here