‘ऑक्सफर्ड’नेही केले नगरच्या पुत्राचे कौतुक; पहा आएएस विजय कुलांगे यांची महत्वाची बातमी

करोना संक्रमण रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा स्थानिक पातळीवर शास्त्रीयदृष्ट्या योग्य निर्णय घेऊन त्याची प्रभावी अमलबजावणी आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी म्हटले आहे. मुंबईत धारावी आणि अनेक ठिकाणी त्यालाच यश आलेले आहे. असेच यश अहमदनगरचे पुत्र असलेल्या आएएस विजय कुलांगे यांनीही मिळवले आहे.

ओदिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाची अशीच दखल ऑक्सफर्ड विद्यापीठाने घेतली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लहान भागांवर लक्ष केंद्रित करायला हवे, ही बाब ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 310 शहरांचा अभ्यास केल्यानंतर कबूल केली आहे. ओदिशातील गंजाम आणि महाराष्ट्रातील धारावीकडून हे शिकता येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ओदिशाच्या गंजाम जिल्ह्यात दोन मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ऑगस्टमध्ये कोरोना वाढीचा दर 59 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे आता 20 हजार 430 रुग्णांपैकी 98 टक्के संपूर्ण बरे झाले आहेत. केवळ 188 रुग्ण बाधित आहेत. संक्रमण थांबवण्यासाठी सरपंचांचे हात बळकट करण्यात आले. प्रत्येक गावात कोव्हिड मॅनेजमेंट कमिटी तयार करण्यात आली. त्यांनी घरोघरी जाऊन सहा वेळा स्क्रीनिंग केली. नियम न पाळणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एक हजारांहून अधिक स्वयंसेवकांची यंत्रणा कामाला लागली. पाच गावांमध्ये एक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली. गंजामचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे हे मूळ अहमदनगरचे. राळेगण म्हसोबा हे त्यांचे गाव. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कुलांगेंचे कौतुक केले होतेच. मात्र जागतिक स्तरावरही त्यांची दखल घेण्यात आली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here