वेदनेतला ‘संतोष’ हरपला; हस्तलिखितापासून टेक्नोसॅव्ही बनलेल्या माणसाचा प्रवास थांबला

ग्रामावार्ता एक्स्प्रेस न्यूज चॅनेलचे संस्थापक-संपादक संतोष शिंदे यांचे बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर २०२०) निधन झाले. त्यांचा प्रवास म्हाणजे हस्तलिखित मासिक चालवणारा तरुण ते डिजिटल युगाचा साक्षीदार असाच आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ह. भ. प. सिद्धीनाथ महाराज मेटे (संस्थापक-अध्यक्ष, युवक प्रबोधन समिती, महाराष्ट्र राज्य) यांनी शब्दबद्ध केलेल्या आठवणी लेखस्वरुपात..

तारीख लक्षात नाही. पण सप्टेंबर 2014 मध्ये संतोष शिंदे नामक दिसायला छोटा असणारा एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणला तिरंगा प्रिंटर्सचे मालक मेटे महाराज कोण आहेत? मी म्हणलं, मीच आहे काय काम आहे. संतोष म्हणाला, मला मेटे महाराजांकडे काम आहे.
मी पुन्हा म्हटलं, मीच आहे मेटे महाराज. त्यांचा काही विश्वास बसेना. कारण महाराज म्हणलं की धोतर आणि पांढरा कुर्ता हा पोशाख सर्वांच्याच डोक्यात घुसलेला. मग संतोष तरी त्याला अपवाद कसा असणार? महाराज पँन्ट-शर्टवर असतात याची जाणीव बहुधा संतोषला नसावी हे माझ्या लक्षात आले. मग मी सावरून घेतले. नंतर त्याने सांगायला सुरुवात केली, ‘मी ग्रामवार्ता हे हस्तलिखीत साप्ताहीक चालवत आहे. म्हणजे हाताने दस्त्यावर लिहुन त्याच्या झेरॉक्स काढायच्या व त्या गावात व परिसरात वाटप करायच्या. आणि विशेष म्हणजे माझा पेपर लोक पाच रुपये किंमतीला विकत घेतात. हे ऐकुन मला आश्चर्य वाटले. मग संतोषचे वडील कै. डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी संतोषची शारीरीक व्याधीविषयी मला माहिती दिली. मला खुप वाईट वाटले इतका हुशार माणुस पण देवाने या मानसावर काय वेळ आणली म्हणुन मी संतोषला सहकार्य करण्याचे ठरवले. आणि आमचा मैत्रीचा प्रवास सुरू झाला.

संतोष म्हणाला, मी आत्तापर्यंत हस्ललिखीत दिवाळी विशेषांक काढत आलो आहे. पण आता मला प्रिंटींग स्वरुपात विशेषांक तयार करण्याची करायचा आहे. धारवाडी येथील ह.भ.प. भगवान महाराज शास्त्री यांनी तुमचे नाव सांगीतले म्हणून मी तुमच्याकडे प्रिंटींग संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आलोय. संतोषचे वडील डॉ. शिंदे हे खारे कर्जुने (ता. नगर) येथे नुकतेच पशुधन पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले होते. निंबळक या ठिकाणी वास्तव्यास होते. कारण संतोषला त्यावेळी पंधरा दिवसाला डायलिसीसला आणावे लागत असे. मग त्यांना 100 पानी दिवाळी विशेषांकाचे कोटेशन व त्यासंदर्भात माहिती दिली.

100 पानी दिवाळी विशेषांक काढणं तसं मोठं काम होतं. याचा विचार करुन संतोषला कोणाची तरी मदतीची अपेक्षा होती. यातच निंबळक येथील ग्रामस्थांनी त्यांना या गावात पत्रकार महादेव गवळी हे साप्ताहीक राज्यकर्ता पेपर काढत असतात अशी माहिती दिली. मग संतोष व डॉक्टर दोघेही महादेव गवळींच्या घरी गेले, दिवाळी अंकाविषयी चर्चा केली. काही दिवसांनी दोघेही एक दिवस माझ्याकडे आले व म्हणाले आम्ही दोघे एकत्र दिवाळी अंक करत आहोत. मलाही आनंद वाटला. एकाला दोघेजण झाले. त्यांनी मला गळ घातली, तुम्हाला सहकार्य करावे लागेल. मीही तयार झालो.
अंक करतांना शेवटच्या टप्प्यात दोन दिवस अन दोन रात्र जाहिराती, लेख, चारोळ्या, कथा आदीं साहित्य कलेक्शन व डिटीपी करेक्शन करण्यात गेले. तेव्हापासून संतोषची आणि आमची चांगलीच मैत्री झाली. अंकाचे काम सुरु असतांना संतोषने कामाचा अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी कंपासमध्ये काही पैसे आणले. ते पाहून मी प्रत्येक वेळेस आला की विनोदाने विचारायचो, संतोष कंपास आणली का? संतोषचं उत्तर असयाचं महाराज कंपास आणली पण त्यात पैसे नाहीत. कालांतराने आम्ही युवक प्रबोधन समितीची स्थापना केली. यावेळी संतोषने प्रसिद्धीप्रमुख म्हणून सोशल मिडीयावर प्रबोधनाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं.

पुढे 2015 मध्ये निंबळक येथे महादेव गवळी व संतोष शिंदे यांनी आत्मनिर्धार फाऊंउेशन, राज्यकर्ता-ग्रामवार्ताच्या वतीने शिवजयंती व पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय घेतला. मग वक्ता कोण बालवायचा यावरुन प्रेसमध्ये चर्चा सुरु झाली. महादेव गवळी म्हणाले महाराज तुम्ही व्याख्यान करा. मी कार्यक्रमाचं आयोजन करतो. पण मी आत्तापर्यंत स्टेजवर फक्त किर्तन साथ (गायन) केलं होतं. एकटा स्टेजवर कधीच बोललो नव्हतो. तरीही मित्रांच्या आग्रहास्तव तयार झालो. माझ्या जीवनातलं पहिलं स्टेज निंबळक येथील हनुमान मंदिरात राज्यकर्ता-ग्रामवार्ताने उपलब्ध करुन दिले व ”छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा स्त्रीयांविषीचा दृष्टीकोन” या विषयावर पहिलं व्याख्यान केलं.

याकाळामध्ये संतोष शिंदे यांनी मोठा मित्र परिवार जोडला. पत्रकार महादेव गवळीं यांच्याबरोबरच प्रा. मच्छिंद्रनाथ म्हस्के सर, राम बोराटे, अ‍ॅड. योगेश गेरंगे, बंडु पाटील गेरंगे, सचिन चोभे, संतोष महाराज वाघ, ओमकार खुंटाळे, विनोद सुर्यवंशी, उद्धव काळापहाड, आर.जे.सिध्दांत, अतुल सातपुते, अशोकराजे निंबाळकर, तेजस शेलार, सुशिलकुमार शेळके, पंकज नाईकवाडे, सागर शिंदे, प्रकाश साळवे आदी शेकडो मित्र मंडळीत संतोष रमत राहिला. मलाही त्यामुळे नवे मित्र भेटले.
आता मित्र परिवार हाच संतोषचा जीवन जगण्याचा स्त्रोत झाला होता. पुढे 15-16 साली राज्यकर्ता-ग्रामवार्ता दिवाळी विशेषांक काढत असतांनाही अनेक अनुभव आले. अहमदनगरमधील तिरंगा प्रिंटर्समध्ये जायचं म्हणलं की संतोष आनंदी होतो असे संतोषचे वडिल डॉ. शिंदे सांगत. या अंकाच्या प्रकाशनाच्या वेळी खुप मोठे साहित्यीक बोलवण्यात आले होते. यामुळे संतोषच्या ओळखी खुप वाढल्या. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारीता क्षेत्रातील लोकांशी संतोषने मोठा जनसंपर्क केला. कोणी भेटायला गेले की सेल्फी मात्र नक्की व्हायचा मग ते घर असो वा हाॕस्पिटल हा त्याचा ठरलेला ट्रेंड.

हस्तलिखीत ग्रामवार्ता अंक ते मुद्रीत स्वरुपात दिवाळी अंक, ई-दिवाळी अंक, डिजीटल चॅनल असा मोठा प्रवास संतोषने केला. संतोष प्रतीवर्षी हस्तलिखीत ग्रामवार्ता दिनदर्शिका तयार करत. पण आर्थिक गणित न बसल्याने मुद्रीत स्वरुपात करणं कठीण होतं. यावर्षी त्याने मला मुद्रीत स्वरुपात 24 पाने कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय सारखी दिनदर्शिका तयार करण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी संतोष वाघ महाराज, विनोदकुमार सूर्यवंशी, प्रा. मच्छिंद्र म्हस्के सर, महादेव गवळी, उध्दव केपी (काळापहाड) आदींनी मोठे सहकार्य केले.
या दिनदर्शिकेसाठी लागणारी माहिती कलेक्शन करण्याचं काम वर्षभर चालु होतं. कारण सर्व नवनिर्मिती करणं हे एक संतोष समोरचं आव्हान होतं. तरीही बड्या-बड्या कॅलेंडला लाजवेल अशी पाठीमागील माहिती, लेख, दिनविशेष आदींनी युक्त असे ग्रामवार्ता कॅलेंडर संतोषने तयार केले आणि शेवटची इच्छा पुर्ण केली असेच म्हणावे लागेल. दिनदर्शिकेचे डिटीपीचे काम सार्थक वाळके व वाघ महाराज यांच्यासोबत आजारी असतांनाही संतोषने दोन रात्री जागुन काम पुर्ण केले.
डिजीटलायझेशनच्या जमान्यात युटूबचॅनल व अजुन खुप काही करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती संतोषकडे होती. माझी मुलगी समृदी चांगली अभंग गायन करत आहे हे कळल्यावर माझ्यामागे पिच्छा धरला. मला समृध्दीचे संगीतबध्द गायनाचे व्हिडीओ पाहिजे आहेत असे म्हणाला. पप्पांना दोन दिवसांत घरी पाठवतो पेन्ड्राईव्हवर पाठवून द्या मला कारणं सांगु नका. या अट्टहासी मित्राने सानुचे सर्व अभंगाचे व्हिडीओ एडीटींग करुन आषाढी वारी निमित्त दर रोज एक या नियमाने पंधरा दिवस सलग ही अभंग मालीका ग्रामवार्ता एक्सप्रेसच्या माध्यमातून चालु केले.

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच संतोषच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. आता यापुढे संतोषला जगण्यासाठी डायलिसीसची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले होते. यामुळे डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी सलग 12 वर्षे प्रशासकीय सेवेतील आपला अर्धा पगार संतोषसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. संतोषला जगण्यासाठी पोषक वातावरण तयार करुन दिले. पाहिजे ती वस्तु दुसर्‍या क्षणी संतोषच्या हाता दिली. कोणता मोबाईल हवा आहे, कोणते पुस्तक हे आहे? जे पाहिजे ते वडील डॉ. शिंदे यांनी संतोषला उपलब्ध करुन दिले. किडनी विकारासारख्या व्याधीने दोन वर्षात माणुस आपलं आयुष्य संपवून टाकतो. पंरतु, संतोष याला अपवाद ठरला. खुप दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊन हा माणुस जन्माला आला. डॉ. बाळासाहेब शिंदेंसारखे वडील त्याला लाभले ज्यांनी आपल्या प्रपंचाचा निम्मा खर्च एकट्या संतोषवर केला. आई, भाऊ अमोल आणि संतोषची वाहिनी यांनीही त्याचा लहान मुलाप्रमाणे सांभाळ केला.

संतोषच्या या होप्सने आमच्या सारख्या असंख्य मित्रांना उर्जा मिळत. डॉ. बाळासाहेब शिंदे म्हणायचे मित्र परिवार आल्यावर संतोषचं मण आभाळा एवढं होतं, संतोष खुप खुष होतो. म्हणून आमच्या पैकी कायम कोणीतरी संतोषला भेटायला जात. महिन्यापुर्वी संतोषला निमोनीया झाला. कोरोनाकाळात कोणत्याही हॉस्पीटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने व ऑक्सीजनची गरज असल्याने सिव्हीलमध्ये अ‍ॅडमीट करण्यात आले. काही दिवसांत संतोषने निमोनीयावरही मात केली. पण या काळात डॉ. बाळासाहेब शिंदे यांना कोरोनाची लागन झाली आणि त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संतोषला डायलेसीससाठी दुसर्‍या दवाखाण्यात हलवण्यात आले. परंतु, संतोषला ऑक्सीजनची गरज असल्यामुळे नोबेलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला. चार-पाच दिवसांच्या कोरोना लढ्यात डॉ. शिंदे यांना अपयश आलं अन् डॉक्टरांनी कायमचा श्वास सोडला.
ही दु:खद बातमी समजली. खुप वेदना झाल्या, डॉक्टर गेले आता संतोषचे कसे होणार? असा प्रश्न आमच्यासमोर पडला. संतोषला सांगायचं तरी कसं आणि कुणी सांगायचं की तुझे जगज्जेते वडील या इहलोकाचा निरोप घेवून गले. परंतु लगेच सांगणे आम्हाला परवडणारे नव्हते म्हणून चार दिवसांनी आम्ही सर्व मित्र नोबेलमध्ये दाखल झालो. सचिन चोभे, महादेव गवळी, मच्छिंद्रनाथ म्हस्के, विनोद सुर्यवंशी, ओमकार खुंटाळे, बंडू पाटील गेरंगे आदी मित्र परिवाराने धडा करुन वडीलांची निधन वार्ता सांगीतली. त्याच वेळी संतोष म्हणाला, आता माझा जगुन तरी काय उपयोग, मी ही जातो पप्पांना भेटायला. आता मला जगण्याची इच्छा नाही… मी पप्पांसाठीच जगत होतो….
आम्ही सर्वांनी धिर दिला. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत अशी समजूत घातली. पण संतोष मुळातच समजुतदार. आमची सांगयची काय गरज… आम्ही डॉक्टरांशी खाजगीत संतोषच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगीतले होते. पेशंट ऑक्सीजनशिवाय फार काळ टिकणार नाही. तरीही दोनेक दिवस दवाखाण्यातच ठेवून बुधवारी आम्ही संतोषला डिश्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. संतोषही म्हणाला, मला दगडवाडीचा जायचं आहे. मला आता बरं वाटत आहे.
संतोषने अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसल्यावर मला एक अभंग ऐकवला … आम्ही जातो आमुच्या गावा । आमुचा राम राम घ्यावा ॥ आता नाही येणे जाणे । सहज खुंटले बोलणे ॥ यावर मी म्हणलो संतोष आम्ही चार आठ दिवसांत दगडवाडीला येतो भेटायला. काल अचानक वहिनींचा फोन आला, संतोषभाऊंनी तुम्हाला अर्जंट बोलवलं आहे. ते सर्व मित्रांना हाका मारत आहेत. महाराज आणि गवळी, चोभे सर, वगैरे आले का? मला कायम विचार आहेत तुम्ही लवकरात लवकर निघा. एका तासांत संतोषचा बंधु अमोलचा फोन आला गोटीराम गेला… ऐकुन मन सुन्न झालं… मित्रा तुझ्या जगण्याने खुप लोकांना जगण्याची उर्मी निर्मान करुन दिलीस.. पॉझिटीव्ह विचार करण्याची शक्ती अर्पण केलीस.. पण शेवटच्या लढाईत मात्र हा खंबीर सेनापती हरला तो कायमचाच.. आणि उरला फ़क़्त आठवणीत आणि डिजिटल युगाच्या भिंतीवर..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here