‘तेव्हा’ ढोंगी बुवा व ढोंगी बायांचे मुखवटे गळून पडले; शिवसेनेची जळजळीत टीका

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज हाथरस प्रकरणावर भाष्य करत उत्तरप्रदेशच्या योगी सरकारवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

योगींचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही हेच त्यांनी सिद्ध केले. मुंबईत सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक पोहोचले, पण पन्नास दिवस उलटून गेले तरी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचे पुढचे पानही त्यांना उलटता आले नाही. सीबीआय हाथरसला जाणार असेल तर ठीक, पण जाऊन करणार काय? त्या पीडित मुलीलाच सरकारने जाळून राख केले व पुरावे मातीत मिसळले. हे सर्व हाथरसच्या पोलिसांनी ‘वर’ विचारल्याशिवाय केले काय?

सगळे काही संगनमतानेच झाले आहे. हाथरसमध्ये येणाऱया राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आजही पोलीस लाठ्या चालवत आहेत. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांवर अंदाधुंद लाठीमार करण्यात आला. जयंत चौधरी हे अजित सिंगांचे पुत्र. त्यांनाही पोलिसांनी चोप दिला. माजी पंतप्रधान व शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरणसिंग यांचे जयंत चौधरी हे नातू आहेत, पण ज्या पोलिसांनी इंदिरा गांधी यांच्या नातवास सोडले नाही व राहुल गांधींच्या कॉलरलाच हात घातला, प्रियंका गांधींशी पुरुष पोलिसाने धक्काबुक्की केली तेथे जयंत चौधरींना कोण ओळखणार? सरकारने इतके बेभान होऊनही वागू नये. आता पोलिसांनी प्रियंका गांधींची माफी मागण्याचे नाटक केले आहे, पण प्रियंकांशी झालेली झटापट त्यावेळी जगाने पाहिली आहे. हाथरसप्रकरणी जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हाथरसच्या आसपास मेळावे घेतले जातात व त्या मेळाव्यांचे नेतृत्व भाजपचे पुढारी करतात असे प्रसिद्ध झाले आहे. तसे काही खरोखरच घडले असेल तर ते कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणेच आहे. अशा किळसवाण्या मेळाव्यांत मुंबईत अन्याय, अत्याचार वगैरेंविरुद्ध लढणाऱ्या नट्यांनी घुसून जाब विचारायला हवा. मुंबईत एक भूमिका व उत्तर प्रदेशात वेगळी भूमिका हे बरोबर नाही, पण हाथरसच्या निमित्ताने अनेक ढोंगी बुवा व ढोंगी बायांचे मुखवटे गळून पडले आहेत. सुशांतप्रकरणी जे लोक महाराष्ट्राला बदनाम करायला गेले ते स्वतःच हाथरसच्या खड्डय़ात पडले. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here