कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि व्हा मालामाल; वाचा अधिक (भाग -२)

ग्रामीण भागात कांदा प्रक्रियेचे लहान युनिट सुरु करण्यासाठी सुमारे २ लाख ते ५ लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च करुन एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहज कांदा प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतात. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या कांद्याच्या चकत्या किंवा पावडरला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. इंग्लंड, जर्मनी, जपान, आफ्रिका, हाँगकाँग, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये कांद्याच्या चकत्या आणि पावडर निर्यात केली जाते. या प्रक्रिया केलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. तसेच कांदा पावडर, पेस्टचा वापर विविध मसाले, सूप, सॉस यासारख्या पदार्थांमध्येही केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने पर्वणी आहे.

कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि व्हा मालामाल (भाग – १) वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- https://bit.ly/30wfBxe

कांदा प्रक्रिया केल्यानंतर तुमचा माल निर्यात करण्यासाठी सुरुवातीला एजंट लोकांची मदत घ्या. कमिशन बेसीसवर अनेक एजंट शेतकऱ्यांचा माल थेट निर्यात करण्यास मदत करतात. किंवा शेतकऱ्यांनी निर्यातीबाबत प्रशिक्षण घेतल्यास त्यांचाही त्यांना मोठा लाभ होऊ शकतो. तीन ते चार महिन्याचे निर्यातीबाबतचे विविध कोर्स आहेत. तेही शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील. त्यामुळे शेतकरी थेट निर्यातदारही होऊ शकतो आणि लाखोंनी कमाई करु शकतो. 

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसाम्रगी

१) कांद्याचे बाहेरील आवरण काढण्याचे यंत्र : अशा प्रकारच्या ऑटोमॅटिक यंत्राचा वापर करून आपण कांद्याच्या बाहेरील आवरण काढण्यास उपयोग करू शकतो. या यंत्राचा वापर करून आपण साधारण ४०-५० किलो कांद्यावरील आवरण प्रतितासाला काढू शकता. अशी मशीन अंदाजे १५००० रुपयांपर्यंत मिळू शकते. यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या मशीनदेखील बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीनुसार त्यांची किंमत आणि क्षमता वेगवेगळी असते. 

२) कांद्याच्या मुळ्या कापण्याचे यंत्र : कांद्याची शेंडे, मुळ्या कापण्यासाठीही यंत्र आहे. कमीत कमी १२००० पासून पुढे या मशीन मिळू शकतात. एका तासात १०० किलो कांद्यांची शेंडे व मुळ्या कापल्या जातील, असेही मशीन आहेत. मात्र, असे मशीन महागडे असून, कमी किमतीचे मशीन घेऊन तुम्ही गुंतवणूक वाचवू शकता. 

३) कांदा धुण्यासाठी यंत्र : कांद्याच्या मुळ्या, शेंडे आणि बाहेरील आवरण काढल्यानंतर कांदा स्वच्छ करण्यासाठी एक विशिष्ट यंत्र वापरले जाते. त्यामुळे धूळ व अन्य खराब घटक कांद्यापासून वेगळे करता येतात व कांदा स्वच्छ होतो. कमित कमी १० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करुन असे यंत्र तुम्ही घेऊ शकता. 

४) चकत्या करण्यासाठी यंत्र : मशीनमध्ये कांदा स्वच्छ केल्यानंतर चकत्या करण्याच्या यंत्राद्वारे कांद्याच्या चकत्या केल्या जातात. या यंत्रांमध्ये ०.४ मि. मी. पासून ०.८ मि. मी. आकाराच्या चकत्या करता येतात. हे यंत्र ऑटोमॅटिक असून बाजारात क्षमतेनुसार या यंत्रांची किंमत वेगवेगळी असते. मात्र, कमीत कमी १० हजारांपासून पुढे या यंत्राची किमत असते. यंत्राच्या क्षमतेनुसार याची किंमत बदलत जाते. 

५) कांदा वाळवण्यासाठी यंत्र : या यंत्राला डिहायड्रेटर किंवा ड्रायर असे म्हणतात. यात चकत्या केलेला कांदा वाळवला जातो. या प्रक्रियेत कांद्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकले जाते. त्यामुळे असा कांदा दिर्घकाळ टिकतो. या प्रक्रियेसाठी चकत्या केलेला कांदा हा १० ते १२ तास ५५ अंश ते  ६० अंश सेल्सीअस एवढ्या तापमानात ड्रायरमध्ये ठेवावा लागतो. त्यामुळे चकत्या वाळविण्यासाठी ड्रायर आवश्यक आहे. बाजारात १२ पासून १९० पर्यंत ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत. प्रत्येक ड्रायरची किंमत ट्रेच्या संख्येनुसार वेगवेगळी असते. 

६) गिरणी: ड्रायरमध्ये वाळवलेल्या कांद्याच्या चकत्या गिरणीच्या साहाय्याने पावडरमध्ये रूपांतरित करतात. अशा प्रकारच्या कांद्याची भुकटी करणाऱ्या गिरण्या बाजारात क्षमतेनुसार उपलब्ध आहेत. प्रति तासाला ५० किलो क्षमता असलेली मशीन लघुउद्योगाच्या दृष्टीने पुरेशी ठरते. ही मशीन १५ हजार रुपयांपासून पुढे बाजार मिळते. ही पावडर हवाबंद बाटलीमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये भरुन निर्यात केली जाते. 

या प्रक्रिया युनिटसाठी सुमारे २ ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यातून प्रक्रिया केलेल्या मालाला आपण स्थानिक पातळीवरही मार्केट उपलब्ध करु शकतो. स्थानिक मॉल, विविध सोसायट्यांमध्ये या मालाची थेट विक्री करुनही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो. असे केल्यास कांद्यापासून होणारे नुकसान टाळून मोठा लाभ शेतकरी कमावू शकतात. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here