शिवसेनेचा हल्लाबोल; गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत?

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. अखेर सुशांतसिंगची हत्या नसून आत्महत्या आहे, हे समोर आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला. रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा ‘बनाव’सुद्धा चालला नाही, पण सुशांत ‘ड्रग्ज’ घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर ‘ड्रग्ज’ प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता. सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?

हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here