‘ते’ प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले; शिवसेनेची ‘त्यांच्यावर’ जहरी टीका

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. अखेर सुशांतसिंगची हत्या नसून आत्महत्या आहे, हे समोर आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता. आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे करतच होते. मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस दल आहे, पण मुंबई पोलीस लपवाछपवी करीत आहेत, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा धुरळा उडवला. त्यात बिहारच्याच नव्हे, तर देशभरातील काही गुप्तेश्वरांचा गुप्तरोग बळावला. सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल.

मुंबई पोलिसांनी तपासात जी नैतिकता व गुप्तता दाखवली ती एखाद्याचे मृत्यूनंतर धिंडवडे निघू नयेत यासाठीच, पण सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच पहिल्या 24 तासांतच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिहार राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत. बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. मुंबई पोलीस सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या 40-50 दिवसांत

सीबीआय काय करतेय?

हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here