अमित शहांचा संदर्भ देत शिवसेनेचा सवाल; ‘तो’ अहवाल अंध भक्त नाकारणार आहेत काय?

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. अखेर सुशांतसिंगची हत्या नसून आत्महत्या आहे, हे समोर आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत.

याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱयांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱया गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळय़ांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे. एखाद्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे केव्हाही वाईटच. सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here