अशा पद्धतीने कमी खर्चात करा बटाटा प्रक्रिया उद्योग; वाचा अधिक

बटाट्याला अपेक्षित भाव मिळत नाही, खर्च जादा आणि उत्पन्न कमी अश्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असतात. त्यावर मात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी करार शेतीचा आधार घेतला आहे. मात्र त्यातही बटाट्याची गुणवत्ता नसल्याचे कारण देऊन फसवणूक होणे, ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव मिळणे अशी प्रकरणे समोर येतात. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनीच बटाटा प्रक्रिया उद्योगात उतरणे आवश्यक आहे. बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहज सुरू करू शकतात. बटाट्यापासून चिप्स, वेफर्स बनवून त्याची विक्री करून चांगला नफा शेतकरी कमावू शकतात. त्यासाठी काही मशिनरी आवश्यक असून त्यांची माहिती या लेखातून आम्ही देणार आहोत. बटाटा चिप्स, वेफर्स यांना दिवसेंदिवस प्रचंड मागणी वाढत आहे. बटाटा चिप्स, वेफर्स बनविणाऱ्या अनेक मोठ्या खासगी कंपन्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी स्वादिष्ट चिप्स, वेफर्स बनवल्यास स्थानिक पातळीवरील बाजारपेठ काबीज करणे सहज शक्य आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर बटाटा उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे आवश्यक आहे. छोट्या स्तरावर हा उद्योग सुरू करण्यासाठी १ लाख ते दीड लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे.   

तळलेले चिप्स आणि भाजलेले चिप्स अश्या दोन प्रकारात चिप्स बनविता येतात. चवीनुसार त्याचे साधे चिप्स, खारवलेले, मसालेदार चिप्स असे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल. स्थानिक बाजारात, किरकोळ विक्रेते, साखळी विक्रेते, मॉल किंवा ऑनलाइन रिटेल स्टोअरमार्फत हे तयार केलेले चिप्स विकता येतील. याचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेतकऱ्यांना बटाट्यापासून लाखोंची कमाई करता येणार आहे. छोट्या प्रमाणामध्ये उद्योगाच्या उभारणीसाठी पुढील यंत्रे आवश्यक आहेत. 

१) साल काढण्याचे यंत्र : चिप्स तयार करण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढावी लागते. ही साल काढण्यासाठी बाजारात विविध यंत्र उपलब्द आहेत. या यंत्राच्या तळाशी गोलाकार चकती असते. ही चकती बटाट्यावर फिरून साल निघून वेगळी होते. या चकतीचा व्यास १४ इंच, जाडी ०.५ इंच असते. साल काढलेले बटाटे आपोआप पुढे सरकवले जातात. या यंत्रात सिंगल फेजवर चालणारी १ एचपी क्षमतेची मोटार असते. या यंत्राचे वजन साधारण ५५ किलो आहे. यात एका वेळेस १० किलो बटाट्याची साल काढली जाते. याची किंमत १६ हजारांपासून पुढे आहे. 
२) बटाटा कापण्याचे यंत्र (पोटॅटो स्लाइसर) : साल काढलेले बटाट्यापासून छोटे छोटे गोलाकार काप काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्रात सिंगल फेज मोटार वापरलेली असते. एका तासाला साधारण २०० किलो बटाट्याचे काप केले जातात. याची किंमत २० हजारांपासून पुढे आहे. 
३) डिहायड्रेटर किंवा ड्रायर : बटाट्याचे चिप्स दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील पाणी काढणे आवश्यक असते. म्हणजे ते वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी हे मशीन वापरतात. हे यंत्र बटाट्याच्या कापमधील पाणी शोषून घेते. हे शोषलेले पाणी आतील गोलाकार भांड्यात साठवले जाते. दर काही टप्प्यानंतर हे भांडे काढून त्यातील पाणी काढून टाकावे. एका वेळेला १० किलोच्या कापचे पाणी काढता येते. यात २ एचपीची सिंगल फेज मोटर असते. सुमारे २६ हजारांपासून पुढे या यंत्राची किंमत असते. 
४) तळण यंत्र (चिप्स फ्रायर) : वाळवलेले म्हणजे डिहायड्रेट केलेले चिप्स या यंत्राद्वारे तळले जातात. तेल गरम करण्यासोबतच हे तेल सातत्याने फिरते ठेवले जाते. त्यामुळे तेल खराब होत नाही. त्याच प्रमाणे तळाशी जमा होणारा चिप्सचा मलदा काढून टाकला जातो. हे यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक असते. एका तासाला सुमारे २० ते २५ किलो चिप्स तळले जातात. याची किंमत ५० हजारांपासून पुढे आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here