कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि व्हा मालामाल; वाचा अधिक

भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. दरवर्षी कांद्याचे बाजारभाव ढासळतात आणि शेतकरी रस्त्यावर उतरतात. सरकारकडून आश्वासन मिळते मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. कांदा उत्पादनाचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र, कांद्याचे भाव ढासळल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारभाव ढासळणे, शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणे आणि स्वत: कर्जबाजारी होणे, यापासून वाचण्यासाठी एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे तो म्हणजे कांद्यावर प्रक्रिया करणे. 


अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी कांदा काढल्यानंतर व्यापाऱ्यांना विकून टाकतात किंवा चाळीमध्ये साठवून ठेवतात. अनेकदा कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. चाळीत साठवलेला कांदा खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. म्हणूनच कांदा प्रक्रिया उद्योग सुरु होणे ही काळाची गरज आहे. कांदा प्रक्रिया हा तुलनेने खूप सोपा आणि सहज करता येणारा उद्योग आहे. अगदी ग्रामीण भागातही कांदा प्रक्रिया उद्योग तुम्ही सुरु करु शकता. कांद्यापासून विविध पदार्थ तयार केले जात असून, या पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यातदेखील होत आहे. कांद्यावर प्रक्रिया उद्योगातून तेलापासून ते पेस्टपर्यंत असे अनेक पदार्थ तयार केले जातात. विशेष म्हणजे परदेशात प्रक्रिया केलेल्या कांद्याला मोठी मागणीही आहे. त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योग सुरु करुन शेतकरी व शेतकरी गटांना चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. 


कांदा प्रक्रिया करुन संभाव्य नुकसान शेतकऱ्यांना टाळता येऊ शकते. कांद्याच्या चकत्या किंवा पावडर तयार करुन हे पदार्थ मॉलमध्ये विकले जाऊ शकतात. अनेक मोठ्या हॉटेलांमध्येही या पदार्थांना मागणी असते. किंवा या पदार्थांची निर्यातही शेतकरी करु शकतात. कांद्यापासून तेल काढण्याची प्रक्रिया खर्चिक असली तरी चकत्या बनविणे किंवा पावडर तयार करणे त्यातुलनेत सोपे आणि कमी खर्चिक आहे. हा प्रक्रिया उद्योग कमी भांडवलात ग्रामीण भागात करता येण्यासारखा आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी या प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आवश्यक झाले आहे. एकूण कांदा उत्पादनाच्या फक्त २ ते ५ टक्के कांद्यावरच आपल्याकडे प्रक्रिया केली जाते. उर्वरित कांदा हा हॉटेल किंवा इतर पदार्थाच्या निर्मितीत वापरला जातो. त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला भारतात मोठी संधी आहे. युरोप, अमेरिकामध्ये प्रक्रिया केलेल्या कांद्याला मोठी मागणी आहे. कांद्याच्या चकत्या, कांद्याची पेस्ट वापरण्याचे प्रमाण अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. 


अशी होते कांदा प्रक्रिया :-
१) कांद्यापासून चकत्या किंवा पावडर बनवण्यासाठी शक्यतो पांढरा कांदा वापरतात. लहान मानेचा कांदा ही प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.
२) कांद्याचा टोकाच्या बाजूचा बाजूचा भाग कापून साल काढून साधारण ५ ते १० मी.मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात. 
३) या चकत्या मिठाच्या पाण्यात साधारण २ तास भिजवल्या जातात. 
४) त्यानंतर अंदाजे ५५-६५ अंश तापमानात ड्रायरमध्ये १२ तास या चकल्या ठेवल्या जातात. 
५) या प्रक्रिया केलेल्या मालाला हवाबंद डब्यात पॅक करतात.
(क्रमश..)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

(कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक भांडवल, यंत्रसामग्री आणि निर्यात याविषयीचा लेख उद्या सकाळी १० वाजता प्रकाशित केला जाईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here