द्राक्ष उत्पादकांची लाखोंची फसवणूक; पहा नाशिकमध्ये नेमका काय प्रकार घडलाय

शेतमालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य येण्यापुर्वीच देशभरात खेडाखरेदी वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, त्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना अनेकांना जीवनातून उठवून गेल्या आहेत. आताही नाशिकमधील आठ शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांनी लाखोंचा गंडा घातला आहे.

द्राक्ष खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आठ शेतकऱयांची चार परप्रांतीय व्यापाऱयांनी एकूण २५ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दिंडोरी आणि वणी पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱयांविरुद्ध शुक्रवारी चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

पालखेड येथील दीपक हरिभाऊ जाधव यांच्यासह इतर चार शेतकऱयांकडून उत्तर प्रदेश राज्यातील रायबरेली येथील मोहम्मद युनुस मुस्तफा आणि मोहंमद सईद अली खान या व्यापाऱयांनी एप्रिलमध्ये द्राक्ष खरेदी करून १० लाख ३९ हजार रुपये थकविले होते. या व्यापाऱयांनीच जऊळके (वणी) येथील विश्वास हनुमंत दवंगे यांच्याकडूनही १० लाख ८६ हजार रुपयांचे द्राक्ष खरेदी करताना धनादेश दिले होते. मात्र, ते चेक काही बँकेत वटले नाहीत.

उत्तर प्रदेशातीलच हरीवाला सिंह वैजनाथ सिंह या एएफसी फ्रुट कंपनीच्या पालखेडचे साहेबराव जगन्नाथ गायकवाड व अन्य एकाकडून २ लाख ६२ हजारांचे द्राक्षघड नेले होते. खरेदीपोटी बनावट धनादेश देत त्यानेही फसवणूक केली आहे. तर, हिमाचल प्रदेशातील कोटगढ येथील जीवनसिंह नोठ याने कुर्नोली येथील दिगंबर भास्कर नाठे यांच्याकडून १.५० लाखाचे द्राक्ष घेतले होते. मात्र, वेळोवेळी पैशाची मागणी करूनही अद्याप त्याने पैसे दिलेले नाहीत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here