राऊतांचा ‘त्यांच्यावर’ हल्लाबोल; एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही…

मुंबई :

हाथरस प्रकरण आणि कंगना राणावत- शिवसेना प्रकरण या दोन्हीचा काळ एकच होता. दोन्ही प्रकारांना समोर ठेवत शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये आपली भूमिका मांडली आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-   

देशाच्या एका कन्येचा बलात्कार करून हत्या केली. ती जेव्हा जिवंत होती तेव्हा तिला सुरक्षा पुरवली नाही. तिच्यावर हल्ला झाला तेव्हा वेळीच उपचार करू दिले नाहीत. सत्य आणि तिचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न झाला. मीडियाने हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा रोहिणी सिंग ही सामाजिक कार्यकर्ती त्या मुलीच्या वेदनेचा आवाज बनून लोकांसमोर आली. तेव्हा त्या रोहिणीलाही उत्तर प्रदेश पोलिसांकडून धमकवण्यात आले. सध्या अशा विषयांना कोणी वाचा फोडत नाहीत.

जे पुढे येऊन बोलतात त्यांना धमकावले जाते. जे हाथरसच्या मुलीबाबत घडले.

हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँगेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबास भेटायला निघाले तेव्हा त्यांना पोलिसांनी फक्त अडवले असे नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले, असभ्यपणे धक्काबुक्की केली. ज्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले, श्री. राहुल गांधी हे त्यांचे नातू आहेत एवढे भान तरी कॉलर पकडणाऱयांनी ठेवायलाच हवे होते. एका ‘निर्भया’साठी कधीकाळी देश रस्त्यावर उतरला होता हे इतक्या लवकर मोदींचे सरकार विसरून गेले. 2014 ते 2019 या काळात 12,257 गँगरेप उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश या चार राज्यांत झाले आहेत, पण जात, धर्म, राजकीय प्रतिष्ठा पाहून अशा प्रकरणांत न्याय केला जातो.

एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here