म्हणून राऊत भाजपवर कडाडले; हे एवढे भय, एवढी दहशत, इतकी अमानुषता कशासाठी?

मुंबई :

हाथरस प्रकरण आणि कंगना राणावत- शिवसेना प्रकरण या दोन्हीचा काळ एकच होता. दोन्ही प्रकारांना समोर ठेवत शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये आपली भूमिका मांडली आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-   

महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती. राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना राणावत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. श्री. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला. हाथरसच्या बलात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचूनही काहीच केले नाही. हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे.

रामराज्य हे असे
उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आहेच. तेथे आता एक हजार एकरवर फिल्मसिटी उभारली जात आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक राण्या-महाराण्या यापुढे लखनौ, कानपूरलाच मुक्कामास जातील. यापैकी एखाद्या राणीने ‘योगीराज’ला पाकिस्तान किंवा जंगलराजची उपमा दिली तरी तेथले भाजप कार्यकर्ते संयमाने घेतील व एखाद्या राणीचे बेकायदेशीर बांधकाम तोडायला सरकारी फौजफाटा पाठवणार नाहीत. कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हा विषय महत्त्वाचा. पण ‘हाथरस’सारख्या निर्घृण प्रकरणानंतरही सरकारने हाच संयम दाखवला. त्या पीडितेला मरू दिले. रामराज्यात जणू एक सीतामाईच तडफडून मरण पावली. 14 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता पीडित मुलगी आपल्या भावाबरोबर पोलीस ठाण्यात पोहोचली. बलात्कार व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्या मुलीस लगेच इस्पितळात भरती केले. 29 सप्टेंबरला तिचे दिल्लीत निधन झाले. मंगळवारी मुलीचे निधन होताच दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरू झाले. उत्तर प्रदेशात त्याच्या ठिणग्या उडाल्या. पोलिसांनी त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. दिल्लीपासून 200 किलोमीटर दूर हाथरस येथे पहाटे पोलिसांनीच गुपचूप तिची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. ऍम्बुलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच त्या मुलीच्या आईने स्वतःला ऍम्बुलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय, एवढी दहशत, इतकी अमानुषता कशासाठी?

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here